मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन : बेळगावात बिम्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सिटी बसस्थानकाचे थाटात उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना आहे. यापूर्वी 22 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही लवकरच महाविद्यालय सुरू करण्यात येतील. विविध कारणांमुळे संथगतीने सुरू असलेले बिम्स हॉस्पिटल आता आवश्यक सुविधांसह सुरू करण्यात आले आहे. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.
बेळगाव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, स्मार्ट सिटीअंतर्गत निर्माण करण्यात आलेले बसस्थानक, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कामाचे व महामार्गापासून विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन केले. सिद्धरामय्या म्हणाले, समाजातील असमानता दूर करण्यासाठी गरीब, कनिष्ठ जातीतील लोक, तसेच वंचितांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकार प्राधान्याने कार्य करत आहे. समान समाज निर्माण करण्यासाठी बुद्ध, बसव, डॉ. आंबेडकर व महात्मा गांधीजी यांनी समाजातील सर्वात दुर्लक्षित लोकांना स्वावलंबी बनविण्यासाठी परिश्रम घेतले. याच धर्तीवर राज्य सरकारही कार्य करत आहे.
राज्यातील जनतेसाठी कार्यरत
शक्ती योजनेंतर्गत आतापर्यंत 565 कोटी महिलांनी शून्य दरतिकीट काढून मोफत प्रवास केला आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत 1 लाख 25 हजार महिलांना दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जात आहेत. याशिवाय गृहज्योती, युवानिधी, अन्नभाग्य योजनांच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे जीवनमान सुधारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामुळे समाजातील असमानता दूर होऊन नागरिक एकदिलाने जीवन जगत आहेत. यापुढेही राज्यातील जनतेसाठी कार्यरत राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर भरपाई
बेळगावसह उत्तर कर्नाटकात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील 10 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. कृषी खात्याच्या माध्यमातून राज्यभरात पिक नुकसानीचे काम करण्यात येत असून काही ठिकाणी अद्यापही पाऊस असल्याने सर्वेच्या कामात अडथळे येत आहे. पाऊस कमी झाल्यानंतर सर्वेच्या कामांना गती देण्यात येणार असून सर्वे पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई दिली जाणार आहे. नुकसानीच्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नुकसान भरपाई दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कृषी पीक हानीला प्रति हेक्टर 17 हजार
काही दिवसापूर्वी आपण कलबुर्गीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी बागलकोट, विजापूर, गुलबर्ग्यासह बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. कृषी पिकांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफ मार्गदर्शक तत्वानुसार 8500 व राज्यसरकारकडून 8500 असे एकूण 17 हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई देण्याचेही जाहीर केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. सिंचनामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी 21500 प्रती हेक्टर भरपाई दिली जाणार असून याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
लवकरच कॅन्सर हॉस्पिटल
पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, जिल्ह्यातील गरीब नागरिकांना उत्कृष्ठ वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. आगामी दिवसात बिम्स परिसरात कॅन्सर हॉस्पिटलदेखील निर्माण करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 200 कोटी रुपये खर्चून फ्लाय ओव्हर निर्माण करण्यात येणार आहे. शहरात सुसज्जित स्टेडियमही निर्माण करण्यात येत असून 55 कोटी रुपये खर्चून जिल्हाधिकारी कार्यालयाचा विकास करण्यात येत आहे. आपले सरकार लोकाभिमुख काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
महिला-बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, बिम्समधील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे. गरिबांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी सदर हॉस्पिटल स्थापन करण्यात आले असून याचा फायदा जनतेला होणार आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार करणार असून मुख्यमंत्री लवकरच विद्यापीठाचे उद्घाटन करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील, परिवहन मंत्री रामलिंग रे•ाr, उच्च शिक्षणमंत्री डॉ. सुधाकर, उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य सरकारचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, आमदार राजू कागे, आमदार महांतेश कौजलगी, आमदार बाबासाहेब पाटील, विधानपरिषद सदस्य नागराज यादव, चन्नराज हट्टीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह मान्यवर, विविध खात्याचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.









