50 हून अधिक रुग्णांना अन्यत्र हलविले

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथील इंडस रुग्णालयाला गुरुवारी आग लागली आहे. आग लागल्यावर रुग्णालयात अफरातफरीचे वातावरण होते. रुग्ण आणि डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 वाहनांनी धाव घेतली होती. अग्निशमन कर्मचारी, पोलीस तसेच अन्य बचावपथकांनी बचावकार्य हाती घेतले होते. सुमारे 50 रुग्णांना तातडीने अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्याला सर्वप्रथम आग लागली होती. आगीमागे शॉर्ट सर्किट कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. आग लागण्यापूर्वी रुग्णालयात 50-70 रुग्ण दाखल होते. सर्वांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आहे. तेथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ऑपरेशन थिएटरमधून आग फैलावली असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याची माहिती पोलीस आयुक्त रविशंकर अय्यनार यांनी दिली.









