लोकवस्तीतील गॅरेज हटविण्याची मागणी
मडगाव : मडगाव शहरातील एका कार पेंटिंग करणाऱ्या गॅरेजला शनिवारी सकाळी भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. ही आग गॅस गळतीमुळे लागल्याची शक्यता मडगाव अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे. या आगीत सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. माहितीनुसार, या पेटींग गॅरेजमध्ये वाहनांना पेंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसला गळती लागली होती व त्याच वेळी या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू होते. तेव्हा ही आग भडकली. गॅरेजमध्ये वाहनाचे टायर, सीट तसेच अन्य सामान होते. ते आगीच्या भक्षस्थांनी पडले.
मडगाव अग्निशमन दलाला आगीची कल्पना देताच, दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गॅरेजच्या बाहेर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली असल्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचायला थोडा उशीर झाला. तरी सुद्धा दलाच्या जवानांनी आग विझविण्यात यश मिळविले. ही गॅरेज भर लोकवस्तीत असून ती हटविण्याची मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. ही गॅरेज धोकादाय बनून राहिली होती. काल, शनिवारी आग लागल्याने स्थानिक लोकांना बरेच त्रास सहन करावे लागले. ही गॅरेज हटविण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक लोकांनी केली. काल लागलेल्या आगीत अग्निशमन दलाला घटनास्थळी वेळेत पोहोचता आले नाही. गॅरेज च्या रस्त्यावर वाहने पार्क केली होती. त्यातून वाट काढत घटनास्थळी पोहोचेपर्यंत थोडा विलंब झाला होता. मडगाव शहरात पार्किगची समस्या दिवसेन दिवस गंभीर होत असून त्यावर उपाय योजना आखावी अशी मागणी देखील स्थनिकांनी केली आहे.









