विविध संघ, संस्था, समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत घेतला निर्णय : सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
बेळगाव : हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी चिकोडी, गोकाक तालुक्यातील शेतजमिनीतून 80 कि. मी. लांबीची जलवाहिनी घातली जात आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकल्पामुळे बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्याला भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या विरोधात गुरुवार दि. 30 रोजी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरात बेळगावातील विविध संघ, संस्था, संघटना आणि समाजाच्यावतीने बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामी होते. बैठकीला हॉटेल असोसिएशन, सहकारी पतसंस्था, शेतकरी संघटना, दलित संघटना, लिंगायत संघटना, माजी नगरसेवक संघटना, श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुसकर, माजी मंत्री शशिकांत नाईक, माजी आमदार रमेश कुडची, सुजीत मुळगुंद यांच्यासह इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाडला नेले जात असल्याने सरकारच्या या निर्णयाला बैठकीत जोरदार विरोध करण्यात आला. यासंदर्भात पुन्हा रविवारी बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. तसेच पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली असून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाडला वळविणे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे बेळगाववर पाणीटंचाईचे संकट ओढवणार आहे. हा निर्णय घेत असताना बेळगाव महानगरपालिकेने विरोध करणे गरजेचे होते. बेळगावच्या जनतेच्या मतावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी केवळ स्वार्थासाठी पद मिळविले आहे. खरे तर या विरोधात मनपाच्या बैठकीत ठराव मांडणे जरुरीचे होते. सरकारने हिडकलप्रश्नी घेतलेल्या निर्णयावर नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी स्पष्ट केली. त्याचबरोबर बैठकीला उपस्थित असलेल्या इतरांनी देखील हुबळी-धारवाडला हिडकलचे पाणी वळविण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला. तसेच पाणी नेण्यासाठी घालण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम बंद करण्याची मागणीही करण्यात आली.
प्रत्येकांनी लढ्यात एकजुटीने सहभागी होण्याचा निर्णय
सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वसमावेशक आणि व्यापक लढा उभारण्याचेही ठरविण्यात आले. यामध्ये जात, पक्ष भेद, बाजूला ठेवून प्रत्येकांनी लढ्यात एकजुटीने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले, लिंगायत समाजाचे शंकर गुडस, मराठा समाजाचे रमाकांत कोंडुसकर यांच्यासह इतर नेत्यांवर वेगवेगळ्या संघ, संस्था व समाजाला एकजूट करण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.









