देवगड- वार्ताहर
गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकला बोलेरोची मागून धडक
पती गंभीर जखमी
मुंबई- गोवा महामार्गावरील पेणनजीक हमरापूर येथील ब्रीजवर गॅस वाहतूक करणारा ट्रक व आंबा वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बोलेरो पिकअपमधील देवगड तारामुंबरी येथील सौ. स्पृहा सुमित खवळे (२४) या जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती सुमित चंद्रकांत खवळे (२८) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित खवळे हे आंबा वाहतूक करतात. मंगळवारी रात्री ८ वा. च्या सुमारास ते बोलेरो पिकअपमधून आंबा बॉक्स घेऊन पत्नी सौ. स्पृहा हिच्यासमवेत मुंबईला रवाना झाले. मात्र, बुधवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पेणनजीक हमरापूर येथील ब्रीजवर एचपी गॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करीत असताना सुमित खवळे याच्या बोलेरो पिकअपची क्लीनरच्या बाजूने ट्रकला मागून जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, यात सौ. स्पृहा खवळे या जागीच ठार झाल्या. तर सुमित खवळे हे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच स्थानिकांनी तेथे धाव घेत मदतकार्य राबविले. सुमित खवळे व त्यांची पत्नी सौ. स्पृहा यांना रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सौ. स्पृहा खवळे या मृत झाल्याचे सांगितले. दादर सागरी पोलीस व पेण पोलिसांनी घटनास्थळी जात अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.









