चांद्रयान-3 चे मोठे यश : मानवी मोहिमेची आशा वाढल्याचा इस्रोचा दावा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावरून आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने चंद्रावर पाठवलेल्या यानाने मोठा प्रयोग यशस्वी केला आहे. विक्रम लँडरने कमांडनुसार आपले इंजिन फायर केल्यानंतर स्वत:हून ‘शिवशक्ती पॉईंट’पासून 30 ते 40 सेंटीमीटरपर्यंत उड्डाण करत पुन्हा लँडिंग केल्याने इस्रो शास्त्रज्ञांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. या यशस्वी उड्डाण-लँडिंग प्रयोगामुळे चंद्रावर माणूस पाठविण्याची अनुकूल परिस्थिती असू शकते असा दावा इस्रोकडून केला जात आहे.
इस्रोने ट्विट करत विक्रम लँडरच्या नव्या प्रयोगाविषयी माहिती दिली आहे. विक्रम लँडर हा आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रवास करत आहे. नुकताच विक्रम लँडरने हॉप एक्सपेरीमेंट म्हणजे उडी मारण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. कमांड मिळाल्यानंतर विक्रम लँडरने आपले इंजिन सुरू केले. त्यानंतर 40 सेंटीमीटरपर्यंत उंची गाठत पुन्हा लँडिग केल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. विक्रम लँडरच्या या प्रयोगामुळे इस्रोला अनेक महत्त्वपूर्ण योजनांसाठी मदत होणार आहे. तसेच आता चंद्रावर इस्रोला माणूस देखील पाठवण्यास शक्मय होणार आहे. ही यशस्वी कामगिरी इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या पुनरागमनासाठी सुवार्ता आहे. या मिशनने भारताची तांत्रिक ताकद आणि वैज्ञानिक क्षमता दाखवून दिली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे विक्रम लँडरने नियोजित उद्दिष्टे ओलांडली आहेत. किक-स्टार्ट क्षमतेचा इस्रोच्या भविष्यातील परतीच्या मोहिमांना तसेच क्रूच्या अवकाश उ•ाणांना फायदा होणार आहे.
विक्रम लँडरमधील सर्व प्रणाली आणि उपकरणे ही सुस्थितीत आहेत. चांद्रयानाने 23 ऑगस्टला चंद्रावर पाऊल ठेवले असून त्या दिवसापासून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सक्रियपणे कामे करत आहेत. त्यांनी चंद्राची अनेक छायाचित्रे देखील पाठवली आहेत. तर प्रज्ञान रोव्हरने आपले काम करून आता काही दिवसांसाठी विश्रांती घेतली आहे. यापूर्वी प्रज्ञान रोव्हरच्या बॅटरी चार्ज करून ठेवण्यात आल्या आहेत.
सध्या चंद्रावरचा दिवस मावळला असून आता 14 दिवसानंतर चंद्रावर दिवस उजाडणार आहे. चंद्रावर एका दिवसाचा कालावधी हा पृथ्वीच्या 14 दिवसांइतका आहे. त्यामुळे चंद्रावर आता रात्र सुरू असल्याने प्रज्ञान रोव्हरदेखील झोपी गेले आहे. त्यानंतर काहीच दिवसात प्रज्ञान रोव्हर आपले काम पुन्हा सुरू करणार आहे. आता शिवशक्ती पॉईंटजवळ रात्र होण्यापूर्वी विक्रम लँडरलाही स्लीप मोडमध्ये ठेवले जाणार आहे.









