शेतात पुरले…अवयव विखुरले…पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी गाडले
प्रतिनिधी/ गदग
बेपत्ता महिला किंवा तरुणींचे पुढे काय होते? हे अनेक प्रकरणांमध्ये कळत नाही. बेपत्ता महिलांपैकी काहीजण घरी परततात तर काहीजणींचा कधीच तपास लागत नाही. त्या हयातीत आहेत की नाही, याचाही उलगडा होत नाही. गदग जिल्ह्यात मात्र सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर या खळबळजनक खुनाचा उलगडा झाला आहे.
प्रेम प्रकरणातून त्या तरुणीने आपल्या प्रियकराला लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्याने तिचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे. बेटगेरीचे मंडल पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा थंड डोक्याने खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी प्रियकराने तिचा मृतदेह पुरला होता. तब्बल सहा महिने पाठपुरावा करूनही याची पुसटशी माहितीही पोलीस किंवा त्या तरुणीच्या कुटुंबीयांना मिळू नये, याची काळजी त्याने घेतली होती.
12 जानेवारी 2025 रोजी सकाळी मधुश्री इराप्पा अंगडी (वय 23) मूळची राहणार नारायणपूर, सध्या राहणार पुट्टराजनगर-गदग ही तरुणी बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या भावाने बेटगेरी वसाहत पोलीस स्थानकात नोंदवली. मधुश्रीचे ज्याच्याबरोबर प्रेम प्रकरण सुरू होते, त्या सतीश हिरेमठ (वय 28) राहणार नारायणपूर, ता. गदग याच्यावर संशय व्यक्त करून मधुश्री बेपत्ता होण्याला सतीश कारणीभूत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते.
सुरुवातीपासूनच पोलिसांनी सतीश हिरेमठला बोलावून त्याची चौकशी केली. 16 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजता आपण मधुश्रीला हातलगेरी गावात सोडून पुढे कोटूमचगीला गेल्याचे तो सांगत होता. 12 डिसेंबरपासूनच मधुश्री बेपत्ता होती. ज्या ज्यावेळी पोलीस चौकशी करतील, त्यावेळी सतीश काही ना काही उत्तर देत होता. जिल्हा पोलीसप्रमुख बी. एस. नेमगौडा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एम. बी. संकद, गदगचे पोलीस उपअधीक्षक मुर्तूजा खादरी, नरगुंदचे पोलीस उपअधीक्षक प्रभूगौडा किरेदळ्ळी व सीईएनचे पोलीस उपअधीक्षक महांतेश सज्जन आदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेटगेरीचे मंडल पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला.
13 जून रोजी पुन्हा सतीश हिरेमठला बोलावून त्याची चौकशी केली असता गेल्या पाच-सहा वर्षांपासून मधुश्री व आपले प्रेमसंबंध सुरू होते. मधुश्रीने लग्नासाठी तगादा लावला. बेंगळूरला जाऊन लग्न करूया, असे सांगत आपण तिची समजूत काढत होतो. 16 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता गदग येथील मधुश्रीच्या चुलत्याच्या घराजवळून तिला मोटारसायकलवरून घेऊन जाऊन नारायणपूर येथील आपल्या शेतजमिनीवर नेले. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास लग्नाच्या मुद्द्यावरून जोराचे भांडण झाले. तिच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी शेतात मृतदेह पुरल्याची कबुली त्याने दिली.
कोटूमचगी येथील पेट्रोलपंपमध्ये काम करणारा सतीश हिरेमठ याला प्रेयसीच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. खुनाची कबुली देऊन सतीशने जेथे जागा दाखवली तेथे खोदाई केल्यानंतर मृतदेह सापडला नाही. पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याने सातत्याने प्रयत्न केला आहे. मधुश्रीला मोटारसायकलवरून घेऊन जाण्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. शेवटी पोलिसांनी नारायणपूर येथील शेतवडीत पुरून ठेवलेला सांगाडा बाहेर काढला आहे. प्रेयसीच्या खुनानंतर तिच्या अंगावरील कपडे व चप्पल जाळून टाकणारा खतरनाक सतीश हा अधूनमधून शेतवडीत येऊन मृतदेह कोण्या प्राण्याने बाहेर काढला आहे का? हे बघून जात होता. कारण मृतदेह वरवरच पुरला होता. कोल्ह्या-कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले होते. त्यावेळी हे अवयव वेगळ्या ठिकाणी पुरले होते. सातत्याने पाठपुरावा करूनही पोलिसांना अद्याप कवटी सापडत नाही, अशी स्थिती आहे. गदग-बेटगेरीमध्ये घडलेल्या या घटनेची संपूर्ण राज्यात गंभीर चर्चा सुरू आहे.









