प्रतिनिधी /वास्को
लहान मुलांना अज्ञात टोळीकडून पळवले जात संशय वास्कोपर्यंत पोहोचला आहे. मंगळवारी संध्याकाळी अशाच संशयातून एका व्यक्तींला जमावाकडून बेदम मारहाण झाली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून त्याला सोडवले. ती व्यक्ती मनोरूग्ण असल्याचा संशय आहे.
लहान मुलांना पळवण्यात येत असल्याचा समज गोवाभर झपाटय़ाने पसरत चालला आहे. या प्रकाराचा धसका मुलांनी आणि पालकांनी घेतला आहे. काही शाळांनीही पालकांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्याने भितीमध्ये आणखी भर पडलेली आहे. मडगाव व फोंडा परीसरात मुलांना पळवणारी माणसे असल्याच्या संशयाने काहींना जमावाकडून बेदम मारहाण होण्याच्या घटना गेल्या चार दिवसांत घडलेल्या असून समाज माध्यमांतूनही या वार्ता पसरलेल्या आहेत. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वास्कोतील टी.बी. कुन्हा चौकातही अशाच संशयामुळे एका मध्यमवयीन व्यक्तीला बेदम मारहाण झाली. लाथा बुक्क्यांनी आणि लाठीनेही त्याला मारण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. या घटनेचा लगेच व्हिडियो व्हायरल झाल्याने ही बातमी सर्वत्र पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती एका लहान मुलाला हात लावून त्याच्याशी काही तरी बोलू लागल्याने ते मुल घाबरले. त्यानंतर हा माणूस मुलांना पळवणाऱया टोळीतीलच असल्याचा समज क्षणात लोकांमध्ये पसरला. या संशयाने जमावाने त्याला जमीनीवर पाडून बेदम मारहाण केली. सदर व्यक्ती मनोरूग्ण असल्याचा संशय असून पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचार व तपासणीसाठी चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये काही वेळ ठेवून रात्री पुन्हा पोलीस स्थानकात आणले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.









