अध्याय पंचविसावा
ईश्वरी अंश असलेला आत्मा आणि जीवात्मा यातील फरक स्पष्ट करताना भगवंत म्हणाले, माया ही माझ्या आधीन असून तिला स्पर्श न करताच मी तिला आपल्याबरोबर वागवत असतो. मायेला वागवणारा व तिला नाहीशी करणारा प्रभु मीच होय. जरी आत्मा हा माझाच अंश असला तरी तो जेव्हा देहात प्रवेश करतो तेंव्हा तो जीवात्मा मायेच्या अधीन होतो. त्यामुळे त्याला सत्त्व, रज, तम हे तीन गुण आपोआपच येऊन चिकटतात. त्या गुणांमध्ये जीव आसक्त होतो ते गुण त्याला हवं तसं नाचवतात. त्यामुळे तो संसारबंधनात बांधला जातो. मायेमध्ये प्रतिबिंबित झालेले जे चैतन्य असते, त्यालाच जीवपणा असे म्हणतात. तीन गुणांनी त्या जीवाला बद्ध करून देहाभिमान दृढ होतो. जीवाला देहाभिमान चिकटला असता तो मायेच्या अधीन होतो. म्हणून मायेबरोबरच तिचीच निर्मिती असलेल्या, जीवाचाही मी आपोआपच स्वामी ठरतो. जीव हा गुणांच्या अभिमानाने बद्ध झालेला असतो, म्हणून तो सेवक झाला. म्हणून जो स्वधर्म पालन करून माझी सेवा करेल तो त्रिगुणातून मुक्त होईल आणि जन्ममरणाच्या बंधनातून सुटेल. तीन गुण सारखेच आहेत. परंतु परिस्थितीनुसार त्यातील एक गुण इतर दोन गुणांपेक्षा जास्त प्रभाव दाखवतो आणि त्यामुळे कर्मामध्ये कर्मबंध उत्पन्न होतो. याचाच अर्थ जोपर्यंत तिन्ही गुण सारख्याच प्रमाणात असतात त्यावेळी कोणतेही कर्म बंधन निर्माण होत नाही. मनुष्य जन्माला आलेला असताना त्याच्यामध्ये तिन्ही गुण सारख्याच प्रमाणात असतात आणि म्हणूनच लहान मुले निरागस असतात पण मनुष्य जसजसा मोठा होत जातो तसतसा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यातील एखादा गुण वाढून मनुष्य परिस्थितीच्या मोहात अडकतो. येथे एक गोष्ट लक्षात घे माणसाच्या पूर्वकृत्यानुसार त्याच्या आयुष्यात या जन्मीच्या घटना घडत असतात परंतु त्या त्या वेळी कसे वागायचे ते तो त्याच्या बुद्धीनुसार ठरवू शकतो. आता बुद्धी झाली तरी मायिकच असल्याने तिही त्रिगुण युक्तच असते. म्हणून जर सत्वगुण वाढला असेल तर ती सात्विक निर्णय घेऊ शकते. म्हणून प्रत्येकाने सत्वगुण वाढवायचा प्रयत्न करावा अर्थात कोणतीही चांगली गोष्ट वाढवायची म्हणजे त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्याउलट वाईट गोष्ट मनुष्य सहजी करू शकतो म्हणून निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक घ्यावा म्हणजे नंतर पश्चाताप करायची वेळ येत नाही. एकेक गुण वाढल्यास त्या गुणाचे स्वरूप कसे असते ते ऐक. जो गुण अतिशय वाढतो, त्याच्या आज्ञेखाली इतर गुण वागत असतात. त्या काळी पुरुषाची स्थिती कशी असते, ती श्रीहरि उद्धवाला सांगत आहेत. सत्त्वगुण हा प्रकाशदायी, निर्मल आणि शांत आहे. तो जेंव्हा रजोगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून वाढतो, तेव्हा पुरूष सुख, धर्म, ज्ञान इत्यादींनी युक्त होतो. जो पुरुष फलाची आशा समूळ सोडून निर्विकल्प अशा निरभिमानपणाने स्वधर्माचरण करावयास लागतो, त्याचे ठिकाणी सत्वगुण हा रज व तम या दोहोंनाही जिंकतो. जेंव्हा भाग्याचे भांडार उघडते, त्यावेळी हरिकथेचे श्रवण घडते, मुखाने हरिनामाची कीर्ति वर्णन करणे आवडते आणि तेणेकरून अत्यंत शुद्ध अशा सत्त्वाची वृद्धी होते किंवा दैवयोगाने सत्संगतीचा लाभ घडला असता भगवंताचे गुणानुवाद ऐकण्याविषयी कान लोलुप होतात आणि वाणी अत्यंत प्रेमाने रात्रंदिवस भगवंताची नामकीर्ति वर्णन करण्यात गढून जाते. अशा प्रकारच्या आचरणाने रज आणि तम हे दोन्ही गुण क्षीण होतात व मोठय़ा उत्साहाने सत्त्वगुण वाढतो. त्या सत्वाची साद्यन्त स्थिती ऐक. तेजोरूपाने पुष्कळ प्रकाशयुक्त, स्वच्छपणाने अत्यंत निर्मळ, शिव म्हणजे शांत आणि सरळ हे सत्त्वाचे केवळ मुख्य स्वरूप होय. ही सत्त्वाची सत्त्ववृत्ती ज्या साधकाच्या हाती लागते, त्या साधक पुरुषाची स्थिती त्या वेळी कशी होते ते सांगतो. त्याला त्यावेळी विवेकाची नौका सापडते. वैराग्याचे आत्मरहस्य त्याला प्राप्त होते. सर्व इंद्रियांमध्ये प्रकाश पडतो आणि स्वधर्म तर शिखरास पोचतो. त्या वेळी लोक त्याला अधर्म, गर्व, अभिमान, खोटेपणा इत्यादि बळजबरीने शिकवीत असले, तरी ती अधर्माची कृत्ये तो मुळीच करीत नाही. दुःखाचे साधन अगदी जवळ आले असतानासुद्धा सात्विक वृत्तीचा मनुष्य सदोदित सुखसंपन्नच असतो.
क्रमशः








