वास्को येथील प्रकार : दाबोळीतील सुधाकर तर्वेची पोलीस स्थानकात तक्रार
वास्को : फेसबुकवर झळकलेल्या एका जाहिरातीला भुलून गुंतवणूक केलेल्या दाबोळीतील एका व्यक्तीला जवळपास पाच लाखांचा गंडा पडला आहे. जवळपास एका महिनाभरात अनोळखी व्यक्तीच्या खात्यांमध्ये त्याने ही रक्कम गुंतवली होती. त्याला तीनशे ते चारशे टक्के लाभ देण्याचे आमिष एका भामट्या दांपत्याने दाखवले होते. या फसवणुकीसंबंधी वास्को पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
यासंबंधी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनसार हा फसवणुकीचा प्रकार नोव्हेम्बर ते डिसेंबर अशा महिनाभराच्या कालावधीत घडला होता. दाबोळी येथील सुधाकर तर्वे या व्यक्तीने यासंबंधी वास्को पोलिसस्थानकात तक्रार दिलेली आहे. राजीव जैन आणि अंकिता जैन अशी नावे धारण केलेल्या दांपत्याने फेसबुकवरील जाहिरातीच्या माध्यमातून सुधाकर यांच्याशी संपर्क करून त्यांना बजाज जॉन्ट अॅडवेन्चरमध्ये गुंतवणूक करण्याची गळ घातली. या वेन्चरव्दारे आपण स्टॉक मार्केटमध्ये व्यवसाय करीत असल्याचे त्यांनी भासवले.
तक्रारदाराने तयारी दर्शवल्यानंतर त्या भामट्यांनी त्याला वॉटस्अॅप ग्रुपमध्ये सहभागी केले व या ग्रुपव्दारे त्याला गुंतवणुकीसंबंधी मार्गदर्शन करीत राहिले. त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून तक्रारदार सुधाकर यांनी महिनाभरात संशयित आरोपींच्या विविध बँक खात्यांमध्ये 4 लाख 78 हजार 950 एवढी रक्कम जमा केली. त्यानंतर मात्र, गुंतवणुकदाराचा त्या दांपत्याशी होणारा संपर्क तुटला. त्यामुळे आपण फसलो गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.









