बेळगाव : सकाळच्या वेळी फिरावयास गेलेल्या इसमाचा भटक्या कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला आहे. मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 7.30 च्या दरम्यान जेड गल्ली शहापूर येथील चर्चसमोर ही घटना घडली असून जोतिबा रेडेकर असे जखमीचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भटक्या कुत्र्यांच्या कळपाकडून आबालवृद्धांवर हल्ले होण्याच्या घटनेत वाढ होत असून यामुळे बेळगावकरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच सांबरा रोडवरील मारुती नगर येथे एका अल्पवयीन मुलीवर हल्ला करून भटक्या कुत्र्यांनी तिचे लचके तोडले होते.
यानंतर जागे झालेल्या मनपाच्या आरोग्य विभागाने महत्त्वाच्या सूचना मांसविक्रेत्यांना केल्या होत्या. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांना कोणीही मनमानी पद्धतीने खाऊ घालू नये, अन्यथा संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कागदी घोडे नाचवले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. मंगळवारी सकाळी 7.30 च्या दरम्यान जोतिबा रेडेकर हे घराबाहेर पडून फिरावयास गेले होते. जेड गल्ली शहापूर येथील चर्चसमोर मागून आलेल्या एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करून पायाचा चावा घेतला. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले. मात्र घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









