सरकारच्या विरोधात बंडाचा तीन एजंट्सचा प्रयत्न : ट्रम्प यांच्या राजदूताला डेन्मार्क सरकारने केले पाचारण
नुक/कोपेनहेगन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या उद्देशाने सरकार पाडविण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप डेन्मार्कने केला आहे. डेन्मार्कच्या गुप्तहेरांनी ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या योजनेदरम्यान ग्रीनलँडमध्ये सरकारविरोधी आक्रोश भडकविण्यासाठी अमेरिकेकडून रचण्यात आलेल्या एका गुप्त कटाचा खुलासा केला आहे. यानंतर डेन्मार्कने राजधानी कोपेनहेगन येथील अमेरिकेच्या वरिष्ठ मुत्सद्द्याला पाचारण केले आहे. ग्रीनलँडवर कब्जा करण्यासाठी अमेरिका एक गुप्त अभियान राबवत आहे. कमीतकमी तीन अमेरिकन नागरिक स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते, असे डेन्मार्कच्या गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या एका नागरिकाने ग्रीनलँडची राजधानी नूकमध्ये स्थानिक राजकारणाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेसाठी कट रचणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांची ग्रीनलँडच्या राजधानीत यादी तयार करण्यात आली आहे. हे अमेरिकन नागरिक डेन्मार्क सरकारच्या विरोधात निदर्शने भडकविण्यासाठी फुटिरवाद्यांची भरती करण्याच्या दिशेने काम करत होते. तर दोन अन्य अमेरिकन नागरिक स्थानिक राजकारणी, व्यावसायिक आणि समुदायाच्या लोकांशी संपर्क निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते.
ग्रीनलँडवर कब्जा करण्याचा प्रयत्न
ग्रीनलँड हे डेन्मार्कचे निम-स्वायत्त क्षेत्र असून तेथे सुमारे 57 हजार लोकांचे वास्तव्य आहे. ग्रीनलँडमध्ये प्रचंड प्रमाणात खजिनसाठे आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे ग्रीनलँडची खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. याचबरोबर ग्रीनलँडवर कब्जा करण्यासाठी ट्रम्प यांनी बळाचा वापर करणार असल्याचेही म्हटले आहे. परंतु डेन्मार्कने ट्रम्प यांच्या या वक्तव्यांचा कठोर शब्दांत विरोध केला आहे. ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या ट्रम्प यांच्या प्लॅनमुळे अमेरिका आणि डेन्मार्कचे संबंध बिघडले आहेत.
डेन्मार्कने वाढविला संरक्षणखर्च
विदेशी घटक दीर्घकाळापासून ग्रीनलँडमध्ये रुची दाखवत आहेत आणि हे क्षेत्र विविध प्रभाव अभियानांचे संभाव्य लक्ष्य असल्याचे डेन्मार्कचे विदेशमंत्री लार्स लोके रासमुसेन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी डेन्मार्कने आर्क्टिक क्षेत्रात स्वत:चा संरक्षणखर्च वाढवून 1.5 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक केला आहे. तसेच आधुनिक ड्रोन्स आणि युद्धनौका त्या क्षेत्रात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अस्थिरता निर्माण करण्याचा कट
अमेरिकेचे हस्तक ग्रीनलँडमधील लोकांशी संपर्क साधून त्यांना ग्रीनलँडच्या स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी चिथावत होते. फुटिरवादी शक्ती निर्माण करत सरकारच्या विरोधात मोर्चा उघडणे हा अमेरिकेचा हेतू होता. ग्रीनलँडमध्ये अस्थिर वातावरण तयार करत त्यावर कब्जा करण्याचा अमेरिकेचा कट होता असे डेन्मार्कच्या गुप्तचर यंत्रणांचे सांगणे आहे. तर यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र ट्रम्प ज्युनियर हे जानेवारी महिन्यात ग्रीनलँड येथे पोहोचले होते.









