विमानफेऱ्या बंद झाल्याचा परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये बेळगावमधील विमानफेऱ्या बंद झाल्याने याचा परिणाम आता प्रवासी संख्येवर होताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात 28,984 प्रवाशांनी बेळगावमधून प्रवास केला होता. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ 23,243 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाकडे झाली आहे. ही बाब चिंताजनक असून, जर विमानफेऱ्या पूर्ववत झाल्या नाहीत तर मोठा फटका बसणार आहे.
बेळगाव विमानतळावरून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा उपलब्ध असल्यामुळे प्रवासी संख्या वाढली होती. परंतु अचानक दिल्ली, हैदराबाद, मुंबई, पुणे या शहरांच्या सेवा रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली, आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई या शहरांना विमानसेवा नसल्याने हुबळी अथवा गोवा येथून ये-जा करावी लागत आहे.
बेंगळूर शहराला सर्वा धक प्रवासी
बेंगळूर शहराला दिवसातून दोन विमानफेऱ्या उपलब्ध असल्यामुळे सध्या सर्वाधिक प्रवासी बेंगळूर सेवेला मिळत आहेत. दिल्ली, हैदराबाद व मुंबई या शहरांना विमानसेवा बंद असल्याने प्रवासी संख्या डिसेंबर महिन्यात यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंद झालेल्या विमानफेऱ्या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नोव्हेंबर महिन्यातील प्रवासी संख्या
- शहर प्रवाशांची संख्या
- बेंगळूर 7606
- दिल्ली 4658
- हैदराबाद 3788
- मुंबई 2072
- अहमदाबाद 1778
- जोधपूर 840
- सुरत 698
- इंदौर 686
- तिऊपती 656
- नागपूर 461









