रस्त्यावर पेरलेले तीन बॉम्ब लष्कराकडून निकामी
इंफाळ :
मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळच्या पूर्वेकडील जिह्यात भारतीय लष्कराच्या बॉम्बनिकामी पथकाने तीन बॉम्ब सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केले. इंफाळपासून 46 किलोमीटर अंतरावर असलेल्या नोंगडॅम आणि इथम गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर भूसुरुंग स्फोटके पेरण्यात आली होती. या स्फोटकांची माहिती मिळताच लष्कराच्या विशेष पथकाने सदर आयईडी निकामी केल्याची माहिती सुरक्षा प्रवक्त्याने दिली. लष्कराच्या या कारवाईमुळे घातपाताचा मोठा प्रयत्न फसला.
गस्त मोहिमेदरम्यान भारतीय लष्करी सैनिकांना रस्त्याच्या कडेला तीन आयईडी एकत्र ठेवलेले दिसले. या स्फोटकांवर लष्कराच्या तुकडीने तातडीने कारवाई केली. यादरम्यान लष्कराने संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून आयईडी सुरक्षितपणे निकामी केल्यामुळे जीवित व वित्तहानी टळली.









