भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची निवृत्ती म्हणजे एका मनमोहक पर्वाची अखेर म्हटली पाहिजे. मनमोहनसिंग यांची 33 वर्षांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द ही सर्वार्थाने वैशिष्ट्यापूर्ण आणि ऐतिहासिक ठरते. किंबहुना, त्याआधीची त्यांची जडणघडण व अर्थविषयातील व्यासंग समजून घेणेही महत्त्वाचे होय. पंजाब प्रांतातील एका छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या मनमोहनसिंग यांचे उच्च शिक्षण पंजाब विद्यापीठातून झाले. तथापि सिंग यांची अर्थशास्त्राविषयक जिज्ञासा इतकी पराकोटीची होती, की त्याकरिता इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातून पदवी मिळविली आणि पुढे ऑक्सफर्डमधून याच विषयातून उच्चपदवीही संपादन केली. त्यानंतर पंजाब विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापनाचे काम करणाऱ्या मनमोहनसिंग यांनी वाणिज्य व अर्थमंत्रालयात दिलेले योगदानही अतुलनीयच होय. अगदी 1972 पासून अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार, अर्थ सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा अत्यंत महत्त्वाच्या पदांवर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवत देशाच्या आर्थिक पायाभरणीसाठीही स्तंभ म्हणून त्यांनी भूमिका बजावल्याचे दिसून येते. तथापि, 1991 ते 1995 हा टप्पा सिंग यांच्याकरिता मैलाचा दगडच म्हणावा लागेल. राजीव गांधी यांच्या निधनानंतर 91 मध्ये देशाची सूत्रे पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे आली. मात्र, त्या वेळी देशाची स्थिती आर्थिक आणीबाणीसारखीच होती, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. देशाची परकीय गंगाजळी आटलेली. ऊपयाचे अवमूल्यन झालेले. अगदी सोने गहाण ठेवण्याची वेळ देशावर ओढवली होती. गंभीर आर्थिक संकटाच्या वादळात सापडलेल्या देशाची नौका सुरळीतपणे पैलतीरावर नेण्याचे काम राव व सिंग या दुकलीने केले. त्यादृष्टीने सिंग यांनी सादर केलेला पहिला अर्थसंकल्प हा ऐतिहासिक व भारताच्या अर्थनीतीला दिशा देणारा ठरला. अवघ्या महिनाभराच्या तयारीत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था खुली केली व उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यालाच आपण खुले आर्थिक धोरण, जागतिकीकरण वगैरे संबोधतो. सुऊवातीला या धोरणावर विरोधकांची टीकेची झोड उठविली. परंतु, हेच धोरण देशाकरिता टर्निंग पॉईंट ठरले. स्वाभाविकच नंतरच्या सरकारांनाही मनमोहन यांच्या अर्थनीतीनुसारच चालावे लागले. याअंतर्गत सिंग यांनी लायसन्स राजला मूठमाती दिली. कंपन्यांना विविध निर्बंधांतून मुक्त करीत स्वातंत्र्य दिले. आयात-निर्यात परवाना धोरणातही आमूलाग्र बदल करण्यात आले. आयात परवाना शिथिल करण्याबरोबरच निर्यातीला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेण्यात आली. त्याचबरोबर परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देत रोजगारनिर्मितीचा उद्देश बाळगण्यात आला. या सगळ्यावर त्याकाळात वाद, प्रतिवाद झाले. चर्चा, ऊहापोह, मतमतांतरे झाली. किंबहुना, मनमोहनसिंग यांनी घेतलेले धाडसी निर्णय व त्याला राव यांनी दिलेली साथ यामुळे आर्थिक पातळीवर भारताची दीर्घकालीन पायाभरणी होणे शक्य झाले. त्यामुळे मनमोहनसिंग यांचा भारताच्या अर्थकारणाचे शिल्पकार किंवा अर्थक्रांतीचे जनक म्हणून होणारा उल्लेख हा यथोचितच म्हणायला हवा. अर्थमंत्रिपदाबरोबरच सिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्दही महत्त्वाची ठरते. 2004 मध्ये पंतप्रधानवर विराजमान झालेल्या सिंग यांनी दहा वर्षे हे पद सांभाळले. यातील पहिला टप्पा हा विशेष नजरेत भरणारा म्हटला पाहिजे. या काळातही देशाला आर्थिकदृष्ट्या ताकदवान बनविण्याचे काम त्यांनी केले. वस्तू व सेवा कर, आधार योजना, मनरेगापासून ते दरडोई उत्पन्न, आर्थिक विकासदरापर्यंत अनेक पातळ्यांवर त्यांच्याच काळात देशाने उल्लेखनीय काम केले. कुणी कितीही बढाया मारल्या, तरी आजही मनमोहनसिंग यांच्या काळातील अर्थगती कुणालाच साध्य करता आलेली नाही. 2008 ते 9 या काळातील जागतिक मंदी आणि मनमोहनसिंग यांच्या धोरणांमुळे त्यापासून भारताचा झालेला बचाव, हाही एक महत्त्वाचा टप्पा मानता येईल. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना या मंदीचे फटके बसले. तथापि, मजबूत बँकिंग व्यवस्था भारताच्या कामी आली. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या सेकंड इनिंगमध्ये टू जी स्पेक्ट्रम व कोळसा घोटाळ्यासारखे आरोप झाले. मात्र, सत्तेत येऊनही हे आरोप विरोधकांना सिद्ध करता आले नाहीत. ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ म्हणूनही त्यांची हेटाळणी झाली. सिंग हे कसे कठपुतळी आहेत, येथपासून ते अत्यंत अश्लाघ्य टीकांचा भडिमार त्यांना सहन करावा लागला. मात्र, आपल्या कारकिर्दीत त्यांनी कधीही संयम ढळू दिला नाही. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर या माणसाने स्वत:ला अध्यापनात डुंबवून घेतले. मनमोहन यांच्या तीन दशकांच्या राजकीय प्रवासात नेहमीच त्यांच्यातील नम्रता, ऋजुता, विद्वत्ता, प्रामाणिकपणाचे दर्शन घडत असे. त्यांनी प्रचारकी थाटाची भाषणे कधी केली नाहीत. पक्षातील प्रतिस्पर्धी असो वा विरोधक, त्यांनी कधीही कुणाचा दुस्वास केला नाही. मुळात ते कधीही राजकारण्यासारखे वागले नाहीत. म्हणूनच जनतेच्या मनातील मनमोहन यांचे स्थान अढळ आहे. ‘इतिहास माझ्याबद्दल नक्कीच दयाळू असेल,’ हे त्यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होताना काढलेले उद्गार अगदी पटण्यासारखे ठरावेत. एरवी माध्यमांनी काय म्हटले, याला फार महत्त्व असण्याचे कारण नाही. देशातील, जगातील अनेक अर्थतज्ञांनी मनमोहनसिंग यांच्या अर्थशास्त्रीय योगदानाचा वेळोवेळी गौरव केला आहे. उद्याच्या अर्थशास्त्राचे विद्यार्थीही हे मनमोहक पर्व समजून उमजून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. पंतप्रधान पंडित नेहरूंपासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत प्रत्येक पंतप्रधानांनी देशाच्या उभारणीत, विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामध्ये मनमोहनसिंग आणखी वेगळे ठरतात. म्हणूनच त्यांची राजकीय निवृत्ती चटका लावते. खरे तर मनमोहनसिंग यांनी दिलेला आर्थिक विचार, ही एकप्रकारची देणगीच म्हणता येईल. त्या अर्थी सिंग आणि त्यांची अर्थनीती कायम देशवासियांच्या मनात घर करून राहील.