मध्यप्रदेशातील भेटाघाट येथील गोपालपूर या शहरातील एका शासकीय बालवाडीत भीतीने थरकाप उडविणारी एक घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या बालवाडीत मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी विकत घेण्यात आली होती. या खेळण्यांमध्ये एक लाकडी घोडा होता. लहानपणी प्रत्येक व्यक्ती कधीना कधी अशा पुढेमागे हालणाऱ्या घोड्यावर बसलेली असते. हा खेळ लहान मुलांना अत्यंत आवडतो. त्यामुळे लाकडी घोडा शाळेच्या प्रमुखांनी विकत आणला होता.
मुले या घोड्याबरोबर खेळत असताना अचानक त्याच्या पोटातून एक काळा जिवंत नागसाप बाहेर पडला. तो पाहून मुले आणि बालवाडीतील इतर कर्मचाऱ्यांची भीतीने बोबडी वळली. त्यांना काहीकाळ काय करावे ते समजेना. सापाजवळ जाण्याचे धाडसही कोणाला होईना. अखेर शाळाप्रमुखांनी प्रसंगावधान राखून साऱ्या मुलांना आणि कर्मचाऱ्यांना तेथून दूर केले आणि सर्पतज्ञांना दूरध्वनीवरुन पाचारण केले. सर्पतज्ञ तेथे काही वेळातच उपस्थित झाले आणि त्यांनी त्या विषारी नागसापाला पकडले. नंतर त्याला नजीकच्या वनप्रदेशात सोडण्यात आले.
अशा प्रकारे एका मोठ्या संकटातून मुलांची आणि शाळेतील इतर कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. सापालाही मारण्याची वेळ आली नाही. त्याला सुरक्षिपणे त्याच्या आधीवासात सोडण्यात आले. त्यामुळे मुले, कर्मचारी आणि साप यांच्यापैकी कोणावरही कोणतेही संकट न येता हा प्रसंग निभावून नेण्यात आला. तथापि, लाकडी घोड्याच्या पोटातून साप कसा निघाला, हे गूढ अद्याप कायम आहे. ज्या खेळण्यांच्या व्यापाऱ्याकडून हा घोडा विकत घेतला गेला होता, तेथे आता चौकशी केली जात आहे. त्या चौकशीचे काय व्हायचे ते होवो, पण आमची मुले भाग्यवान ठरली. त्यांच्यापैकी कोणालाही काही झाले नाही, याचे त्यांच्या आईवडिलांना समाधान आहे. त्यांनी नंतर ते प्रसारमाध्यमांमोर व्यक्तही केले आहे.









