बेळगाव : आपली एखादी छोटीशी मदत दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद फुलवू शकते, हे तरुणांनी ओळखले आणि क्रिकेट मॅच भरवून शिल्लक असलेल्या रकमेतून आई-वडील गमविलेल्या एका चिमुकल्याला छोटीशी मदत केली. क्रिकेटप्रेमींनी दिलेली छोटीशी भेट त्या चिमुकल्याच्या आयुष्यात वेगळा आनंद निर्माण करणारी ठरली. त्यामुळे या तरुणांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शहापूर परिसरातील दैवज्ञ ब्राह्मण सोनार समाजाच्या काही तरुणांनी एकत्र येऊन ‘टकाटक बॉईज’ हा क्रिकेट संघ स्थापन केला आहे. 15 ते 20 जणांनी एकत्र येऊन या संघाच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धांत यश मिळविले.
20 ते 30 वयोगटातील या तरुणांना एक गरीब विद्यार्थी खुणावत होता. क्रिकेट स्पर्धा भरविल्यानंतर शिल्लक असलेल्या रकमेतून वडगाव येथील ध्रुव माटले याला एक छोटीशी भेटवस्तू देण्याचा विचार त्यांनी केला. या संघातील काही जण वडगाव येथे रहात असल्याने त्यांना ध्रुवच्या घरची परिस्थिती माहिती होती. मंगाईनगर, पहिला क्रॉस येथे राहणाऱ्या ध्रुव माटले या चिमुकल्याचे आई-वडील लहानपणीच देवाघरी गेले. त्यामुळे वयोवृद्ध आजी त्याचा सांभाळ करते. सध्या तो शानभाग स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. त्याला वडगाव ते शाळेपर्यंत ये-जा करण्यासाठी सायकल नसल्याचे एका तरुणाच्या निदर्शनास आले. त्याने टकाटक बॉईजच्या तरुणांशी संपर्क साधून ध्रुवला सायकल देण्याचे ठरविले. दोन दिवसांपूर्वी ध्रुवला ही सायकल भेट देण्यात आली.
त्याचा आनंद गगनात मावेना
क्रिकेट मॅच संपल्यानंतर ध्रुव याला मैदानामध्ये बोलावून त्याला सायकल भेट देण्यात आली. अचानक इतकी मोठी भेट मिळाल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावणारा नव्हता. सायकलवरून एक राईड मारून त्याने आपला आनंद व्यक्त केला, हे चित्र पाहणाऱ्यांचे डोळे हलकेसे ओले झाले. सध्याची तरुणाई व्यसनाच्या आहारी जाऊन समाजापासून दूर जात आहे, असे चित्र एका बाजूला असताना दुसरीकडे क्रिकेट मॅचमधील शिल्लक राहिलेले पैसे पार्ट्या करून खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरिबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी केला जाऊ शकतो, हे टकाटक बॉईज स्पोर्ट्स क्लबने दाखवून दिले आहे. टकाटक बॉईज स्पोर्ट्स संघामध्ये सुंदर केळवेकर, वैभव चांदरकर, सारंग काकतीकर, सर्वेश काकतीकर, स्वप्नील बेळवटकर, अक्षय बेकवाडकर, पवन कारेकर, कुणाल केळवेकर, रोशन बांदिवडेकर, ओमकार दड्डीकर, आदित्य घाटकोळकर, प्रीतम कलघटकर, साहिल वेर्णेकर, आकाश बिडीकर, रोहित अर्कसाली, साईश कारेकर, पृथ्वी रेवणकर यांचा समावेश आहे.
आजीकडून ध्रुवचा सांभाळ
ध्रुवची आई तो दीड वर्षाचा असतानाच या जगातून निघून गेली. हे दु:ख पचवत असतानाच दोन वर्षांपूर्वी त्याचे वडीलही देवाघरी गेले. त्यामुळे ध्रुवची संपूर्ण जबाबदारी आजीवर आली. त्याची शैक्षणिक फी एका व्यक्तीकडून भरली जाते. परंतु त्याच्या शिक्षणाचा इतर खर्च आजीलाच करावा लागत आहे. मोलमजुरी करत सध्या तरी त्याची आजी सांभाळ करत असली तरी ध्रुवला आता समाजाच्या मदतीची गरज आहे.









