खरीप पिक वाया : रब्बी पिकाला पोषक : पावसाने उडविली साऱ्यांचीच तारांबळ
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. थंडी सुरू असतानाच अचानकपणे हवामानात बदल होऊन उष्मा जाणवत होता. त्यामुळे पाऊस पडेल, अशी चिन्हे दिसत होती. सोमवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे शहरासह उपनगर व ग्रामीण भागातील जनतेची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसाने थोडी खुशी, थोडा गम दिल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. सायंकाळी अचानकपणे आलेल्या या वळीव पावसाने शहरामध्ये काही ठिकाणी पाणीच पाणी झाले. गटारी तुडुंब भरुन पाणी रस्त्यावर साचले होते. त्यामधून वाहने चालविणे कसरतीचे बनले होते. अचानकपणे पाऊस आल्याने बाजारपेठीतील फेरीवाले, बैठे व्यापारी यांची तारांबळ उडाली होती. या पावसामुळे वीजपुरवठाही काही ठिकाणी खंडित झाला होता. अनेक रस्त्यांवर असलेल्या सखल भागामध्ये पाणी साचून होते. काही ठिकाणी गटारी तुडुंब भरुन पाणी रस्त्यावरुन वाहत होते. त्यामधून वाट काढताना कसरत करावी लागत होती.
सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे साऱ्यांनाच आसरा शोधावा लागला. दुचाकी चालकांना भिजतच घर गाठावे लागले. तर पादचाऱ्यांना विनाछत्रीच पावसात भिजत आडोसा शोधावा लागला. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली होती. पाऊस झाल्याने दिलासा मिळाला तरी हातातोंडाला आलेल्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली होती. त्यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस या पिकांना मोठा फटका बसला. पाणी नसल्याने भात पिक वाळून गेले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भात पिकाला पाणी देण्यासाठी टँकरने पुरवठा केला. मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. सखल भागातील भात पिके काही प्रमाणात भरली होती. त्याच्या सुगीला सुरूवात करण्यात आली असतानाच या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हातातोंडाला आलेला काही घासही हिसकावून घेतल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. काही प्रमाणात भात पिके कापणीसाठी आली होती. मात्र सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने थोड्या प्रमाणात दिलासा देणारी भात पिकेही पावसामुळे वाया गेली आहेत. यामुळे शेतकऱ्याला खरीप हंगामाचा पूर्णच फटका बसला आहे. खरीप हंगाम वाया गेले तरी अधिक पाऊस झाला तर रब्बी हंगामाला तरी हा पाऊस तारक ठरणार आहे, असे शेतकऱ्यांतून सांगण्यात आले. अधिक पाऊस झाला तर भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे नुकसान होणार आहे आणि पाऊस झाला नाही तर कडधान्य पेरणी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे बळीराजा संभ्रमात अडकला आहे.
कडधान्य पेरणीला पोषक वातावरण
निसर्गाच्यासमोर आपले काहीच चालत नाही. निसर्ग कशा प्रकारे साथ देईल त्या प्रकारे आम्हाला कामे करावी लागणार आहेत. एकूणच हताश झालेल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाऊस झाला तर कडधान्य पेरणीला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. याचबराब्sार पाणी समस्याही दूर होणार आहे. सायंकाळी 5.30 च्या दरम्यान पावसाचे आगमन झाले. काही वेळ पाऊस झाला. त्यानंतर विश्रांती घेतली. मात्र पुन्हा ढगाळ वातावरण आणि पावसाला सुरूवात झाली. काही भागामध्ये दमदार पाऊस कोसळला तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला आहे.









