तुटपुंज्या साधनसुविधांमध्येही रेल्वे पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद : आत्महत्या करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी धडपड : 2023 च्या तुलनेत 2024 सालात मृत्यू प्रकरणात वाढ
बेळगाव : गेल्या सव्वादोन वर्षात रेल्वेखाली 129 जण दगावले आहेत. यापैकी 67 जणांनी आत्महत्या केली आहे. रेल्वेखाली होणाऱ्या आत्महत्या टाळण्यासाठी बेळगाव शहर परिसरातील प्रमुख ठिकाणी रेल्वेरूळाभोवती भिंत बांधण्यात आली आहे. कॅसलरॉकपासून शेडबाळपर्यंतच्या रेल्वेरूळावर या घटना घडल्या आहेत. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मृत्युमुखी पडलेल्या 129 जणांपैकी या सव्वादोन वर्षात अद्याप 25 जणांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वाट्याला अनाथाप्रमाणे मरण आले आहे. या काळात रेल्वे पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करूनही त्यांची ओळख पटली नाही. अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या मदतीने पोलीस स्वत:हून बेवारस मृतदेहांवर दफनविधी करतात.
गेल्या सव्वादोन वर्षातील आकडेवारी लक्षात घेता आत्महत्या करणाऱ्यांबरोबरच रेल्वेस्थानक परिसरात किंवा रेल्वेरूळाजवळ आकस्मिक मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही अधिक आहे. रेल्वेस्थानकावर अनेकांचा नैसर्गिकरित्याही मृत्यू झाला आहे. रेल्वेस्थानकावर किंवा रेल्वेरूळाजवळ मृत्युमुखी पडणाऱ्यांची, आत्महत्या करणाऱ्यांची ओळख पटविण्याचे पोलीस दलासमोर आव्हानच असते. हे आव्हान पेलून रेल्वे पोलीस यंत्रणा मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करीत असते. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 253 किलोमीटरची रेल्वेलाईन येते. एका बाजूला शिवठाण तर दुसऱ्या बाजूला कॅसलरॉक व शेडबाळपर्यंत रेल्वे पोलिसांची हद्द येते. 2023 च्या तुलनेत 2024 सालात मृत्यू प्रकरणात वाढ झाली आहे. मात्र, काही प्रमाणात आत्महत्येचे प्रकार घडले आहेत. चालू वर्षी मार्चअखेरपर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
उपलब्ध माहितीनुसार 2023 मध्ये 53 जणांचा तर 2024 मध्ये 61 जणांचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत 15 जण दगावले आहेत. यामध्ये 9 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी 8 जणांची ओळख पटली असून एका मृतदेहाची ओळख पटली नाही. तर मार्चअखेरपर्यंत 5 जणांचा आकस्मिक मत्=यू झाला आहे. या सर्व 5 जणांची ओळख पटली आहे. तर एकाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. 2023 मध्ये रेल्वेस्थानक परिसरात 9 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यापैकी 8 जणांची ओळख पटली असून एकाची सव्वादोन वर्षांनंतरही ओळख पटली नाही. रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या 31 जणांपैकी 26 जणांची ओळख पटली आहे. उर्वरित 5 जण कोण? याची ओळख पटली नाही. 13 जणांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून यापैकी 10 जणांची ओळख पटली आहे. उर्वरित 3 जणांची ओळख पटली नाही.
2024 मध्ये 61 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 25 जणांचे आकस्मिक निधन झाले आहे. 18 जणांचा शोध लागला असून 7 जणांची ओळख पटली नाही. या काळात 27 जणांनी आत्महत्या केली असून 22 जणांचा शोध लागला आहे. अद्याप 5 जणांची ओळख पटलेली नाही. नैसर्गिकरित्या मृत्युमुखी पडलेल्या 9 पैकी 5 जणांचा शोध लागला आहे तर 4 जणांचा शोध लागला नाही. कमीत कमी पोलीस बळ व 253 किलोमीटर इतकी हद्द असूनही रेल्वे पोलीस नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी झटत असतात. खासकरून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर लवकरात लवकर त्याची ओळख पटावी, कुटुंबीयांना त्याची माहिती मिळावी, यासाठी त्यांची धडपड असते. आत्महत्या प्रकरणात तर अनेक दिवस अनेक महिन्यांनंतरही मृताची ओळख पटत नाही. आठवडाभरानंतर मृतदेहावर दफनविधी केला जातो. त्याचे कपडे सांभाळून ठेवले जातात. कपड्यांवरून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
ओळख पटविणे अवघड
गेल्या सव्वादोन वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या 129 जणांपैकी 67 जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची नोंद आहे. यापैकी 25 मृतदेहांची अद्याप ओळख पटली नाही. रेल्वेत प्रवास करताना धावत्या रेल्वेतून पडून काही जणांचा मृत्यू होतो. अशावेळेला मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या खिशातील तिकिटावरून किंवा त्यांच्या खिशात आढळणाऱ्या एखाद्या मोबाईल क्रमांकावरून त्यांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले जातात. यापैकी काहीच सापडले नाही तर त्यांची ओळख पटविणे अवघड होते.
रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. आत्महत्या प्रकरणातही मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. एकतर मृतदेहाचा चेंदामेंदा झालेला असतो. चेहरा विद्रुप झाल्यामुळे त्याची ओळख पटविणे कठीण होते. अशा परिस्थितीत शवागारात मृतदेह ठेवून कुटुंबीयांची प्रतीक्षा करावी लागते. हे सर्व करताना रेल्वे पोलिसांकडे असलेल्या साधनसुविधा मात्र अत्यंत कमी आहेत. तरीही नागरिकांना त्वरित सेवा देण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.









