सकाळपासून रात्रभर सर्वांची तारांबळ : ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचारी तैनात,मध्यरात्रीनंतर बिबट्या उतरण्याची शक्यता

फोंडा : भटक्या कुत्र्यांच्या शोधात शिकारासाठी आलेला बिबटयाच कुत्र्याचा शिकार बनून जिवाच्या आकांतात पळताना त्याने सरळ माड गाठून त्यावर चढला खरा, पण तो माडावरच अडकून पडल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. हा प्रकार काल रविवारी सकाळी कुळण सावईवेरे येथे घडला. तेथील वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अशोक सावईकर यांच्या घरालगत हा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यत बिबटा खाली उतरला नव्हता. ग्रामस्थांच्या सुरक्षितेसाठी वन खात्याचे कर्मचारी रात्रभर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून कडक पहारा देत होते. प्राप्त माहितीनुसार बिबट्या सकाळी 6.15 च्या सुमारास भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीकडे फिरकला होता. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्याला घेरले. जिवाच्या आकांताने पळत असताना तो जमिनीपासून 20 मिटर उंच असलेल्या माडावर चढला. ही घटना सावईकर यांच्या मुलीच्या प्रथम निदर्शनास आली. सोशल मिडीयवर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बघ्यांची गर्दी वाढू लागली. यावेळी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर प्रवेशबंदी करून परिस्थिती हाताळली.
फोंडा तालुक्यातील पहिलीच घटना
फोंडा तालुक्यात बिबट्या माडावर अडकल्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची माहिती क्षेत्रीय वन अधिकारी दीपक तांडेल यांनी दिली. बिवट्याची पूर्ण वाढ झाली असून त्याचे वय दोन ते तीन वर्षे असावे असा अंदाज वर्तविला आहे. बिबट्याला माडावरून उतरण्यासाठी विशेष यंत्रणा वनखात्याकडे नाही. बिबट्याची नजर दिवसा कमजोर असते, रात्रीच्या वेळी तीक्ष्ण बनते. तेव्हा ज्याप्र्रमाणे तो नैसर्गिकरित्या माडावर चढला त्याप्रमाणे उशिरा रात्री घटनास्थळावर माणसांची हालचाल कमी झाल्यावर तो निसटणार, असे तांडेल म्हणाले.
यापुर्वी कधी बिबट्या दिसला नव्हता : सावईकर

कुळण सावईवेरे हा कुळागारांनी नटलेला भाग आहे. या भागात वाहनांची वर्दळही अंत्यत कमी असते. दोन्ही बाजूनी कुळागरे व मध्येच नैसर्गिक पाण्याचा स्रोत असल्यामुळेही हे वातावरण बिबट्याला अनुकुल वाटले असावे. पाण्याच्या शोधातही बिबटा लोकवस्तीत घुसला असावा व त्यानंतर परतताना कुत्र्यांचे झुंड त्याच्या पाठीमागे लागल्यामुळे तो जिवाच्या आकांताने माडावर चढल्याचे चंद्रकांत काशिनाथ सावईकर यांनी सांगितले. यापुर्वी कधीच या भागात बिबट्याचा संचार दिसून आला नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.
चंद्रकांत काशिनाथ सावईकर
हौशे, नवशे, गवशे निसर्गप्रेमी हजर
वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्बिण तसेच कॅमेराच्या लेन्समधून उंचीवरील बिबटच्या हालचाली सावईकर यांच्या घराच्या टेरसवरून टिपल्या आहेत. त्यापुढे त्याच्याकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचे आढळून आले. मडगाव येथील हौशी फोटोग्राफर विवेक नाईक यांना ही माहिती समजल्यावर त्यांनी थेट मडगावहून कुळण सावईवेरे गाठून आपला जंगली जनावरांच्या फोटोग्राफीचा छंद पुरा केला. बिबट्यासारखा चपळ घातक प्राणी छोट्या छोट्या प्राण्यांना पळवून दमछाक करतो. तो माडावर अडकल्याने नाईक यांनी आश्चर्य व्यक्त केले. उद्धव नामक एका निसर्गप्रेमीने आपल्या ड्रोन कॅमेऱ्यासह त्याच्या थरारक हालचाली आपल्या टिपलेल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा थरार सुरु होता.









