कराड-ढेबेवाडी मार्गावर विंगच्या कणसे मळा येथील घटना
वार्ताहर/ कोयना वसाहत
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा बछडा ठार झाला. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर विंग येथील कणसे मळा बसथांब्यावर बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर मृत बछडय़ास पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
विंगसह परिसरात बिबटय़ाचा वावर नित्याचाच बनला आहे. बछडय़ांची संख्याही वाढली आहे. अनेकदा मादीसह त्यांच्या बछडय़ाचे दर्शन येथील शेतकऱयांना झाले आहे. परिसरात सध्या ऊसतोडणी वेगाने सुरू आहे. तोडणी दरम्यान मादीसह बछडे शेतातून बाहेर पडत असल्याचे चित्र येथे आहे.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास विंग येथील कणसे मळा बसथांबा येथे दुभाजक ओलांडताना बिबटय़ाच्या बछडय़ास अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये बछडय़ाचा जागीच मृत्यू झाला. हा बछडा उसाच्या शेतातून आला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी अमोल माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बछडय़ास ताब्यात घेतले. हा बछडा तीन ते चार महिन्यांचा असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्याचे वजन अंदाजे पाच ते सहा किलो असावे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मृत बछडय़ास पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.








