येळ्ळूर म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
प्रतिनिधी/ येळ्ळूर
भाषावार प्रांतरचना करताना मराठी बहुल भाषिक असलेला भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. 1 नोव्हेंबर 1956 रोजी केंद्र सरकारने हा भाग डांबला. तेव्हपासून सीमाभागातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळतात. यावषीही काळादिन पाळून म. ए. समितीतर्फे काढण्यात येणाऱया मूक सायकल फेरीमध्ये मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला.
येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार करत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. याचबरोबर केंद्र सरकार कशा प्रकारे दुर्लक्ष करत आहे, हेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता केंद्र सरकारविरोधातच लढा लढायचा असून सर्वांनी एकजुटीने राहून सरकारविरोधात काढण्यात येणाऱया मूक सायकल फेरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयामध्ये सीमाप्रश्नाचा खटला प्रलंबित आहे. 23 नोव्हेंबर रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे हा मोर्चा यशस्वी करून दाखवायचा आहे. तेव्हा सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, शेकापचे विलास घाडी, भूजंग पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.
या बैठकीला ग्राम पंचायत सदस्य दयानंद उघाडे, शिवाजी नांदुरकर, लक्ष्मण चौगुले, परशराम परीट, राकेश परीट, कृष्णा शहापूरकर, शिवाजी हणमंत पाटील, सूरज पाटील, परशराम बिजगरकर, आनंद मजुकर, भरत मासेकर, मधू पाटील, प्रकाश मालुचे, आनंद घाडी, प्रवीण सायनेकर, प्रमोद बिजगरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांनी आभार मानले.









