स्थानिक मच्छीमार बांधव खुष
प्रतिनिधी /मडगाव
छोटय़ा होडय़ा घेऊन कोलवा-बाणावली परिसरात मासेमारी करणाऱया स्थानिक मच्छिमाऱयांना मोठय़ा प्रमाणात सोलर कोळंबी सापडली आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमाऱयांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या 50 वर्षात अशा प्रकारे सोलर कोळंबी सापडली नव्हती अशा प्रकारच्या प्रतिक्रीया देखील त्यांच्याकडून व्यक्त झाल्या आहेत.
कोलवा, बाणावली, माजोर्डा भागातील स्थानिक मच्छिमाऱयांनी तीन दिवसापूर्वी आपल्या छोटय़ा होडय़ा घेऊन मासळी पकडण्यास सुरवात केली होती. त्यांना बऱया पैकी सोलर कोळंबी साडपली असून प्रचंड प्रमाणात सोलर कोळंबी सापडल्याने, त्यांच्या वजनाने मासे पकडण्याची जाळी देखील फाटल्याचे त्यांनी सांगितले.
जुन महिन्यापासून गोव्यात मासेमारीवर बंदी जारी करण्यात आली होती. ही बंदी 31 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. तत्पुर्वी स्थानिक मच्छिमार आपल्या छोटय़ा होडय़ा घेऊन मासळी पकडण्यास समुद्रात उतरले होते. त्यांनी मासेमारीच्या हंगामाला प्रारंभ करताना समुद्राची पूजा देखील केली होती. यंदा मासेमारीच्या हंगामाला चांगली सुरवात झाली असून अशाच प्रकारे चांगले मासे जाळय़ात मिळू देत अशी देवाकडे त्यांनी प्रार्थना केली आहे.
सोलर कोळंबीला बऱयापैकी दर मिळाल्याने मच्छीमार बांधव एकदम खुष आहेत. पकडण्यात आलेल्या सोलर कोळंबीची निर्यात केली जाते. स्थानिक बाजारपेठेत ऐवढी सोलर कोळंबीची विक्री होऊ शकत नसल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील मासेमारीला अधिकृतरित्या 1 ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. त्यावेळी मोठे ट्रॉलर समुद्रात मासेमारीसाठी निघतील. सद्या शेजारील राज्यातील ट्रॉलर गोव्याच्या हद्दित येऊन मासेमारी करतात, त्यांच्यावर बंदी घालावी अशी मागणी देखील स्थानिक मच्छिमाऱयांनी केली आहे.









