कार्यकर्त्यांचा निर्धार : शहर-तालुका म. ए. समितीची संयुक्त बैठक
बेळगाव : येत्या 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक अधिवेशनाच्या विरोधात म. ए. समितीच्या महामेळाव्याला (महाअधिवेशनाला) मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार शहर आणि तालुका म. ए. समितीच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. रविवारी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी निश्चय केला. शिवाय यंदाचा मेळावा कुठल्याही परिस्थितीत बेळगाव शहरात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
1956 पासून सीमाभागातील मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे. सीमाभागावर हक्क सांगण्यासाठी 2006 पासून कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन भरविले जात आहे. याला विरोध म्हणून दरवर्षी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेऊन मराठी माणसाची ताकद दाखविली जाते. यंदादेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करण्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
आतापर्यंत झालेले अनेक मोर्चे, आंदोलने आणि महामेळाव्यांना कर्नाटक सरकारकडून अटकाव करण्याचा प्रयत्न झाला. मात्र समितीने प्रत्येकवेळी दडपशाही झुगारून मोर्चे, आंदोलने आणि महामेळावेही यशस्वी केले आहेत. त्यामुळे यंदाचा महामेळावा कर्नाटक सरकारची दडपशाही झुकारून यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. म. ए. समितीतर्फे महामेळाव्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. शिवाय पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. मात्र, परवानगी मिळो अगर न मिळो कुठल्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करणारच, असा निश्चय बैठकीत कार्यकर्त्यांनी केला.
घटक समित्यांमार्फत जनजागृती
घटक समितीमार्फत गावोगावी महामेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत जनजागृती केली जात आहे. विशेषत: सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांमध्ये अधिक जागृती सुरू झाली आहे. यावेळी म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, रणजित चव्हाण-पाटील, रामचंद्र मोदगेकर, बी. डी. मोहनगेकर, अॅड. अमर येळ्ळूरकर, मनोहर हुंदरे, मदन बामणे, रणजित हावळण्णाचे आदींनी महामेळाव्याबाबत विचार व्यक्त केले. याप्रसंगी रमाकांत कोंडुसकर, मोतेश बारदेशकर, राजू किणयेकर, अनिल पाटील, अजित जुवेकर, आर. के. पाटील, सचिन केळवेकर यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.









