शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार : समिती जाहीर करील त्याठिकाणी मूक सायकल फेरीसाठी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी मराठी बहुल असलेला सीमाभाग कर्नाटकात डांबण्यात आला. तेव्हापासून आजतागायत 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून गांभीर्याने मराठी भाषिक पाळतात. त्यादिवशी शहरातून मूक सायकल फेरी काढण्यात येते. मात्र कर्नाटक सरकारकडून नेहमीच दडपशाही करण्यात येते. त्यामुळे आता कोणीही परवानगी दिली का? असे न विचारता 1 नोव्हेंबरला म. ए. समिती जाहीर करील त्याठिकाणी मूक सायकल फेरीसाठी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. याचबरोबर त्यादिवशी गांभीर्याने काळादिन पाळावा, असे आवाहन शहर म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले. मराठा मंदिर येथे शहर म. ए. समितीची बैठक झाली. त्यामध्ये हे आवाहन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. सीमाप्रश्नाचा निकाल लागेतोपर्यंत काळादिन पाळण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला. काळादिन असो किंवा महामेळावा भरविताना जिल्हा प्रशासन आणि पोलीस परवानगी देत नाहीत. त्यामुळे एखादी याचिका त्याविरोधात दाखल करता येते का? याचाही विचार करावा, असे म्हणणे रणजीत हावळण्णाचे यांनी मांडले.
माजी नगरसेवक राजू बिर्जे यांनी सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी म. ए. समितीच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. कारण सध्या राष्ट्रीय पक्ष मराठी भाषिक असलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी धडपडत आहेत. आमिषे दाखवत आहेत. त्यामुळे भविष्यात समस्या निर्माण होणार आहे. काहीही करा पण हा प्रश्न निकालात काढा, असे त्यांनी यावेळी सांगितले. मदन बामणे, प्रशांत भातकांडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, महादेव पाटील यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. रणजीत चव्हाण-पाटील यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर दिवंगत झालेल्या म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रकाश मरगाळे यांनी सीमाप्रश्नासंदर्भातील पाठपुराव्याबाबत संपूर्ण माहिती दिली. महाराष्ट्र सरकारकडे आम्ही नेहमीच पाठपुरावा करत आहोत. हा प्रश्न लवकर सोडवावा यासाठी तज्ञ कमिटीला पूर्ण अधिकार दिले आहेत. नुकतीच मुंबई येथे बैठक झाली आहे. मात्र या बैठकीमध्ये झालेले ठराव सोशल मीडियावर अतिउत्साही असलेल्या कार्यकर्त्यांनी अपलोड केले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. सीमाप्रश्न व खटल्याबाबतची माहिती ही अत्यंत गोपनीय ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, रणजीत चव्हाण-पाटील होते. यावेळी अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, नेताजी जाधव, उमेश पाटील यांच्यासह बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.









