प्रतिनिधी / मडगाव
कोलवा येथील इन्फंट जिझस चर्चचा फाम उत्सव सोमवारी भविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावून भक्तिभावाने साजरा केला. स्थानिक तसेच अन्य भागांतील गोमंतकीयांसह शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविकांनी या उत्सवाला उपस्थिती लावली होती. आता गुरुवार 27 रोजी या चर्चचे फेस्त साजरे केले जाणार आहे. फाम म्हणजे फेस्तांची दवंडी असते. त्यानंतर 10 दिवसांनी फेस्त साजरे होते. गोव्यात अन्य चर्चमध्ये फेस्त हा मुख्य उत्सव असतो. मात्र कोलव्यात फाम हा मुख्य उत्सव असतो, त्यामुळे भाविकांची गर्दी असते.
नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिनू जेझूचा हा फाम उत्सव विख्यात आहे. अंगाच्या कोणत्याही अवयवाला दुखापत वा आजार असल्यास तो ठीक होण्यासाठी येथे नवस केला जातो व आजार बरा झाल्यानंतर सदर अवयवाची मेणाची प्रतिकृती मिनू जेझूला फामच्या दिवशी अर्पण करून नवस फेडण्यात येत असतो. त्यामुळे विविध अवयवांच्या मेणाच्या प्रतिकृती विकणाऱयांची संख्या लक्षणीय असते.
गोव्यासह शेजारच्या राज्यांतील सीमावर्ती भागांतील भाविकही नवस फेडण्यासाठी येत असतात. कोविडमुळे मागील दोन वर्षे मोठय़ा प्रमाणात हा उत्सव साजरा करणे शक्य झाले नव्हते. मात्र यंदा भाविकांनी गर्दी केली. सकाळी 5.30 वा. मुख्य प्रार्थनासभा झाली. त्यानंतर मिनू जेझूची मूर्ती वेदीवरून खाली आणून मिरवणूक झाली. कोविड एसओपी पाळून भाविकांनी मिनू जेझूच्या प्रतिमेचे चुंबन घेतले आणि आशीर्वाद घेतले.









