केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, इतरही महत्वाच्या योजनांना मान्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विविध धान्यांच्या न्यूनतम आधारभूत मूल्यांमध्ये (एमएसपी) घसघशीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही वाढ येऊ घातलेल्या खरीप हंगामातील धान्यांसाठी आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. सर्वाधिक वाढ तांदळाची असून ती 143 रुपये प्रतिक्विंटल आहे. या मुख्य निर्णयाबरोबरच बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीला 4 जी आणि 5 जी स्प्रेक्ट्रम देण्यासाठी 89,047 कोटी रुपये संमत करण्याचा निर्णयही घेण्यात आला. हरियाणात ‘हुडा’ शहर केंद्र ते गुरुग्राम या 28 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. तसेच, भारतात कोळसा आणि लिग्नाईट खाणींचा शोध घेण्यासाठीं 2,980 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने किमान आधारभूत मूल्यदरात केलेली वाढ गेल्या कित्येक वर्षांमधींल सर्वाधिक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय खाद्यान्न मंत्री पियुष गोयल यांनी केले. विविध पिकांना दिलेलीं वाढ ही 128 रुपये प्रति क्विंटल ते 805 रुपये प्रति क्विटंल या मर्यादेत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विविध पिकांचे नवे दर
सर्वसामान्य श्रेणीतील भाताला 143 रुपये प्रतिक्विंटल वाढ देण्यात आली असून हा दर आता 2,183 रुपये झाला आहे. अ श्रेणीतील भाताचा दरही 143 रुपयांनी वाढविण्यात असून तो आता 2,203 रुपये करण्यात आला आहे. हायब्रिड आणि मालदंडी ज्वारीच्या दरांमध्ये अनुक्रमे 7 टक्के आणि 7.85 टक्के वाढ करण्यात आली असून ते आता अनुक्रमे 3,180 रुपये आणि 3,225 रुपये प्रतिक्विंटल इतके झाले आहेत. मक्याच्या दरात 6.5 टक्के वाढ करण्यात आली असून तो 2,090 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढविण्यात आला आहे.
महागाईवर लक्ष
केंद्र सरकारने महागाईवर लक्ष ठेवले आहे. गेल्या काही काळामध्ये अन्नधान्यांचा महागाई दर कमी होताना दिसत आहे. हाच कल आगामी काळातही राहण्याची शक्यता आहे. अन्नधान्यांची महागाई वाढली असली तरी ती अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अलिकडच्या काळात अन्नधान्यांची खरेदीही वाढली आहे, कारण लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, असेही प्रतिपादन गोयल यांनी केले.
डाळींच्या दरातही वाढ
मूग डाळीच्या किमान आधारभूत दरात 10.35 टक्के वाढ करण्यात आली असून तो आता 8,858 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. तुरीच्या दरात 6.06 टक्के वाढ झाली असून तो आता 7,000 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. भुईमुगाचा दर 5,850 रुपयांवरुन 6,377 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. तर सोयाबिनच्या दरात 6.97 टक्के वाढ झाली असून तो 4,600 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. सूर्यफूल बीयांच्या दरात 5.6 टक्के वाढ झाली असून तो 6,760 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तीळ, कापूस, लांब धाग्याचा कापूस आदी पिकांच्या किमान आधारभूत दरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. यंदाचा खरीप हंगाम आता सुरु झाला आहे. मात्र, अद्याप मान्सूनचा पाऊस येण्यास प्रारंभ झालेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मान्सूनचा पाऊस केरळमध्ये प्रवेश करेल, असे अनुमान आहे.
शेतकऱ्यांच्या लाभात वाढ होणार
नव्या किमान आधारभूत दरांमुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होणार आहे. बाजरी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक 82 टक्के लाभ त्यांच्या उत्पादनखर्चावर मिळणार आहे. तर तुरीसाठी 58 टक्के, सोयाबिनसाठी 52 टक्के आणि उडीदासाठी 51 टक्के असे लाभाचे प्रमाण असेल अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्के लाभ मिळाला पाहिजे, अशाप्रकारे किमान आधारभूत दराची रचना करण्यात आली असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
बीएसएनएलसाठी भरीव तरतूद
बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातल्या दूरसंचार कंपनीला 4 जी आणि 5 जी सुविधा पुरविता यावी, यासाठी 89,047 कोटी रुपये दिले जाणार आहेत. या रकमेतून ही कंपनी 4 जी आणि 5 जी स्पेक्ट्रमची खरेदी करु शकणार आहे. तसेच या कंपनीचे अधिकृत भांडवल 1 लाख 50 हजार कोटीवरुन 2 लाख 10 हजार कोटींवर नेले जाईल. कंपनीला प्रिमियम वायरलेस सेवा पुरविता यावी म्हणून 700 मेगाहर्टझ्साठी 46,338.60 कोटी रुपये तसेच 70 मेगाहर्टझ्साठी 26,184.20 कोटी रुपये देण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला.
गुरुग्राम मेट्रो प्रकल्पाला मान्यता
हुडा शहर केंद्र ते गुरुग्राम या हरियाणातल्या 28.50 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाला बैठकीत मान्यता देण्यात आली. या मार्गावर मेट्रो जास्तीत जास्त 80 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकेल. हा पूर्ण प्रकल्प येत्या चार वर्षांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. या भागाच्या सर्वंकष आर्थिक विकासासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरेल, असा सरकारचा विश्वास आहे. या प्रकल्पाला एकंदर 5,452 कोटी रुपये खर्च येणार आहे. गुरुग्राम शहराची लोकसंख्या 25 लाख असून त्यापैकी प्रतिदिन 5 लाख लोक या मेट्रोने प्रवास करतील अशी शक्यता आहे.
कोळशासाठी तरतूद
देशात कोळसा आणि लिग्नाईट यांच्या नव्या खाणी शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी 2,980 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोल इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या कार्यक्षेत्रात जे भाग नाहीत, अशा भागांमध्ये कोळशाचा शोध घेतला जाणार आहे.
अपघातातील मृतांना श्रद्धांजली
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मणिपूर येथील हिंसाचारात मृत झालेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठक सुरु होण्यापूर्वी सर्व उपस्थितांनी एक मिनिट शांतता पाळून ही श्रद्धांजली दिली.
बॉक्स
नव्या किमान आधारभूत किमतींचे कोष्टक
पीक नवा दर गेल्या वर्षीचा दर वाढ
भात 2,183 2,040 143
भात अ श्रेणी 2,203 2,060 143
ज्वारी हायब्रिड 3,180 2,970 210
ज्वारी मालदंडीं 3,225 2,990 235
बाजरी 2,500 2,350 150
नाचणी 3,846 3,578 268
मका 2,090 1,962 128
तूर 7,000 6,600 400
मूग 8,558 7,755 803
उडीद 6,950 6,300 350
भुईमूग 6,377 5,850 527
सूर्यफूल 6,760 6,400 360
सोयाबिन 4,600 4,300 300
तीळ 8,635 7,830 803
रामतीळ 7,734 7,287 447
कापूस मध्यम 6,620 6,080 540
कापूस लांब 7,020 6,379 640









