आमदार सेठ यांची माहिती, विसर्जन मार्गाची केली पाहणी
बेळगाव : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सोमवारी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ व प्रशासनाच्यावतीने विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. गणेशोत्सव मंडळांना विसर्जनादरम्यान कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी आमदारांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच गणेशभक्तांना विसर्जन मिरवणूक पाहता यावी, यासाठी यावर्षी धर्मवीर संभाजी चौक येथे मोठी गॅलरी उभारण्याची सूचना केली. आमदार आसिफ सेठ यांच्यासमवेत पोलीस आयुक्त भूषण बोरसे, मनपा आयुक्त शुभा बी., महापौर मंगेश पवार, शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणीदौरा केला. विसर्जन मिरवणुकीदिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली.
नागरिकांना विसर्जन मिरवणूक पाहता यावी, यासाठी धर्मवीर संभाजी चौक येथे मोठी गॅलरी उभारली जाणार असल्याचे आमदारांनी सांगितले. मारुती गल्ली, गणपत गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली यासह इतर परिसरात पाहणीदौरा करण्यात आला. रामदेव गल्ली येथे गटारींवर फरशा घातल्या जाणार आहेत. विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी मंडळांनी लवकर गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढून सहकार्य करण्याचे आवाहन महापौरांनी केले. पोलीस आयुक्तांसमवेत गणपत गल्ली कॉर्नर येथे होणाऱ्या गर्दीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एम. शिंदे, महामंडळाचे सदस्य आनंद आपटेकर, नगरसेवक व मनपा कर्मचारी उपस्थित होते.
…अन्यथा केबल तोडल्या जातील
विसर्जन मिरवणूक सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. परंतु काही इंटरनेट ऑपरेटर कंपन्यांच्या ओव्हरहेड केबल विसर्जनासाठी अडथळे ठरत आहेत. विसर्जन मिरवणुकीपूर्वी संबंधित कंपन्यांनी केबलची उंची वाढवावी. अन्यथा महानगरपालिकेकडून त्या तोडल्या जातील, असा इशारा आमदार आसिफ सेठ यांनी दिला.









