मनपाच्या कारभाराबद्दल नगरसेवकांची नाराजी : पुढील बैठकीत तपशील देण्याची सूचना
बेळगाव : महानगरपालिकेतून मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचे अधिकाऱ्यांनी दाखविले. मात्र या खर्चाबाबतचा संपूर्ण अहवाल देण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे खर्चाच्या अहवालामध्ये गोंधळ झाल्याचा संशय लेखा स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. खर्चाची आकडेवारी तुम्ही मांडलात, मात्र त्याबाबतचा संपूर्ण तपशील देणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला. मंगळवारी लेखा स्थायी समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी खर्च केलेल्या कोणत्याच रकमेचा तपशील दिला नसल्यामुळे नगरसेवक चांगलेच संतप्त झाले होते. बऱ्याच अधिकाऱ्यांनी या बैठकीला दांडी मारली. त्याबाबत सुरुवातीलाच नगरसेवकांनी तक्रार केली. मात्र बेळगावमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या दाखल झाले आहेत. त्याठिकाणी सर्व अधिकारी व कर्मचारी गेल्याचे सांगण्यात आले. प्रारंभी बैठकीचा अजेंडा देण्यात आला. तसेच मागील बैठकीमध्ये झालेल्या ठरावांबाबत माहिती देण्यात आली. लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षा सविता पाटील यांनी मागील बैठकीबाबतची माहिती दिली. त्याला सर्वांनी मंजुरी दिली. मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांनी केलेल्या इतिवृत्तावर अनेक नगरसेवकांनी आक्षेप नोंदविले. नगरसेवकांना समजू नये असाच इतिवृत्त दिल्यामुळे गोंधळ उडाला.
पेट्रोल, डिझेलसाठी किती रक्कम खर्च करण्यात आली? त्याबाबतचादेखील संपूर्ण अहवाल बैठकीत दिला गेला नाही. काही महिन्यामध्ये अधिक खर्च तर काही महिन्यामध्ये अत्यंत कमी खर्च दाखविण्यात आला होता. त्यावर इतकी तफावत का? असा प्रश्न नगरसेवकांनी केला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचेच टाळले होते. एकूणच गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने पुढील बैठकीत संपूर्ण माहिती घेऊनच यावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात महानगरपालिकेने कोणकोणत्या ठिकाणी मंडप घातले होते? त्याठिकाणी फलक का लावले नाहीत? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी तो या बैठकीचा विषय नाही, असे सांगितले. यामुळे राजकारण करू पाहणाऱ्या त्या नगरसेवकांची चांगलीच गोची झाली. काही नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली.
बेळगाव मनपाला निधी कमी का?
राज्य सरकारकडून सर्व महानगरपालिकांना निधी दिला जातो. मात्र बेळगाव महानगरपालिकेला सर्वात कमी निधी दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे याबाबत काही नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना विचारले असता बेळगाव महानगरपालिकेला ग्रेड 2 दर्जा असल्याने निधी कमी मिळाल्याचे सांगितले. केवळ 8 कोटी 9 लाख रुपये निधी दिला आहे. तर इतर महापालिकांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे दिसून आले.
ग्रंथालयाच्या खर्चाबाबतची चर्चा
आयुक्तांच्या कक्षासमोर असलेल्या खुल्या जागेमध्ये आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अत्याधुनिक अशा ग्रंथालयाची उभारणी केली. कामासाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची सोय केली आहे. मात्र आम्हाला विश्वासात न घेता त्याची उभारणी केली म्हणून काही नगरसेवकांनी ग्रंथालयासाठी खर्च केलेल्या निधीचा तपशील मागितला. मात्र अद्याप बिले देण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीला उपमहापौर रेश्मा पाटील, सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी, नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली, रवी धोत्रे, शंकर पाटील, बाबाजान मतवाले, अफ्रोज मुल्ला, डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
थकीत रक्कम देत नाही तोपर्यंत वीजबिल भरू नका!
बेळगाव : हेस्कॉमकडून महापालिकेचे 17 कोटी रुपयांचे येणे आहे. असे असताना हेस्कॉमची वीजबिले का भरली जातात? असा प्रश्न उपस्थित करत जोपर्यंत हेस्कॉम आपली रक्कम देत नाही तोपर्यंत बिल भरू नका, असे नगरसेवकांनी लेखा स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले. महानगरपालिका हेस्कॉमला प्रत्येक महिन्याला कोट्यावधी रुपये बिल भरत असते. मात्र आपली रक्कम हेस्कॉम देत नाही. यामुळे महानगरपालिकेचा कारभार सांभाळणे कठीण जाणार आहे. बऱ्याच वर्षांपासून 18 कोटी रुपये हेस्कॉमकडे बाकी आहेत. त्याचे व्याजच अधिक झाले असेल. तेव्हा याबाबत हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून ती रक्कम वसूल करा, असे नगरसेवक हणमंत कोंगाली यांनी सांगितले.
शहरामध्ये हेस्कॉमने केबल घालण्यासाठी तसेच पोल उभारण्यासाठी रस्ते खोदाई केली होती. त्यासंदर्भातील ती रक्कम आहे. जवळपास 18 कोटीची ही रक्कम होणार आहे. तसेच हेस्कॉमने शहरामध्ये विद्युतखांब बसविले आहेत. त्यावेळी झालेली नुकसानभरपाई घेण्यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवा, असेदेखील यावेळी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हुबळी येथील हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकांशी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. त्यावर जोपर्यंत आपली रक्कम येत नाही तोपर्यंत वीजबिल भरू नका, असे सुनावण्यात आले. वीजबिल भरण्यास एक दिवस उशीर झाला तर हेस्कॉमचे कर्मचारी वीजपुरवठा तोडतात. मग आम्ही का त्यांच्याकडे रक्कम ठेवायची? असा प्रश्नदेखील नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. एकूणच हेस्कॉमच्या थकीत रकमेवरून स्थायी समितीमध्ये बराच गोंधळ उडाला होता.
नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना आणले जेरीस
महानगरपालिकेतील लेखा स्थायी समितीच्या बैठकीला अधिकारी अनुपस्थित होते. काही मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थायी समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले. तर बैठक का घेतली? बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा करायची हे देखील नगरसेवकांना माहीत नसल्याचे मंगळवारी झालेल्या बैठकीत दिसून आले. लेखा स्थायी समितीच्या चेअरमन सविता मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील उपस्थित होत्या. नगरसेवकांना इंग्रजीमधून इतिवृत्त देण्यात आले. मात्र इंग्रजीमधील हे इतिवृत्त आम्हाला समजत नाही, असे म्हणत कन्नड भाषेमध्ये इतिवृत्त देण्याची मागणी करण्यात आली. मात्र संगणकामध्ये पूर्वीपासूनच इंग्रजी इतिवृत्त असल्यामुळे ते दिल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाचे म्हणजे कोणत्या वर्षाचा जमा खर्च आहे, हेच नगरसेवकांना माहिती नाही. त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांना रकमेबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी अधिकाऱ्यांकडे नमूद केलेल्या रकमेबाबतच्या कोणत्याच फायली नव्हत्या. पुढील बैठकीत कागदपत्रे दिली जातील, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. यावेळी अनेक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रत्येकवेळी तुमच्याकडून अशी उत्तरे ऐकण्यासाठी बैठक घेतली जाते का? असा प्रश्न नगरसेवकांनी केला. जमा-खर्चाबाबतच्या दिलेल्या इतिवृत्तामध्ये अनेक चुका असल्याचे दाखवून देण्यात आले. काही खर्च दोनवेळा दाखविल्याची तक्रारही काही नगरसेवकांनी केली आहे. तर खर्च केलेल्या रकमेबाबतची संपूर्ण माहितीच नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच जेरीस आणले. खर्च केला मात्र त्याबाबतची संपूर्ण बिले कोठे आहेत? याची विचारणा करण्यात आली. एकूणच लेखा स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केवळ सावळा गोंधळ दिसून आला.









