पुणे / प्रतिनिधी :
तक्रार देण्यास आलेल्या महिला पोलीस निरीक्षकावर पोलीस चौकीच्या दारातच हल्ला करून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी मुंबई पोलीस दलातील फोर्स वनच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
नीलेश आंदेश भालेराव (रा. सांताक्रूझ, मुंबई) असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अभिरुची पोलीस चौकीत आरोपीविरुद्ध तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. तक्रार देऊन बाहेर पडत असताना आरोपीने त्यांच्यावर हल्ला चढवून विनयभंग केला. दरम्यान, फिर्यादीने 2018 रोजी आरोपीवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हा त्याच्या घरच्यांच्या विनंतीवरून तक्रार मागे घेण्यात आली होती. यानंतर तो पुन्हा फिर्यादींना फोन करून त्रास देत होता. याची तक्रार देण्यास त्या पतीसमवेत अभिरुची चौकीत गेल्या होत्या. आरोपी नीलेशही तेथे आला. तेथे येऊन त्याने तुम्ही माझा त्रास आणखीनच वाढवला, असे म्हणत चौकीतून बाहेर पडताच हल्ला करून विनयभंग केला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिव करत आहेत.









