कारवार शिवाजी सर्कलजवळील घटना
कारवार : केवळ नशीब बलवत्तर होते म्हणून तोडण्यासाठी नारळाच्या झाडावर चढलेला मजूर बचावल्याची घटना शुक्रवारी येथे घडली. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, येथील शिवाजी सर्कलजवळील नमन बेकरी समोरचे झाड सुकून धोकादायक बनून राहिले होते. सुकलेले झाड तोडण्याचा निर्णय कारवार नगरपालिकेने घेतला. त्यानुसार शुक्रवारी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक मजूर झाड तोडण्यासाठी झाडावर चढला होता. तथापि त्याचवेळी झाड मुळापासून उन्मळून विद्युत वाहिन्यावर कोसळले. झाड तोडण्याच्या निमित्ताने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे मजूर सुदैवाने बचावला. तथापि झाड विद्युत वाहिन्यावर कोसळून तीन विद्युत खांबांची हानी झाली.









