रस्त्याला वाली कोण, ग्रामस्थांचा सवाल : चिखलामुळे वाहनधारकांचे हाल : प्रशासनाचे दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागातील ठिकठिकाणी मुख्य व संपर्क रस्ते डांबरीकरणाचे करण्यात आलेले आहेत. मात्र नंदीहळळी ते गर्लगुंजी या संपर्क रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का झाले आहे, असा सवाल या भागातील वाहनधारक व नागरिकांतून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. या रस्त्यासाठीच निधी उपलब्ध होत नाही का? अशा प्रतिक्रियाही उमटू लागलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले आहेत. नंदीहळळी ते गर्लगुंजी हा संपर्क रस्ता या भागातील वाहनधारकांसाठी तसेच नागरिकांसाठी अनेक गावांना ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. मात्र सध्याची रस्त्याची परिस्थिती पाहता या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून ये-जा करायची कशी, असा प्रश्न वाहनधारकांना पडलेला आहे.
गेल्या तीन-चार वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे आम्हाला पावसाळ्यात या रस्त्यावरून मार्ग काढणे मुश्किल बनले आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे ख•s पडलेले आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. तसेच रस्त्याचा बहुतांशी भाग हा पूर्णपणे उखडून गेलेला आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखलच पसरलेला आहे. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करीत असताना अनेक वाहनधारक चिखलात घसरून पडलेले आहेत. अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक करू लागले आहे. नंदीहळळी गावातील बरीचशी शेती या रस्त्याच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे शेत शिवाराकडे रोज शेतकऱ्यांना जावे लागते. मात्र सध्याची रस्त्याची परिस्थिती पाहता चालत जाणेही मुश्किल बनले आहे. या रस्त्यावरून जनावरांसाठी चारा आणावा लागतो. तसेच बी बियाणे, खत आदींची वाहतूक करावी लागते. रस्त्यावरून बैलगाडी घेऊन जाणेही अवघड बनले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. हा रस्ता तिथल्या वाहनधारकांसाठी व स्थानिक नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
दुचाकीस्वारांचे रोज अपघात
नंदीहळळी ते गर्लगुंजी हा रस्ता या भागातील वाहनधारकांसाठी महत्त्वाचा आहे. रोज या रस्त्यावरून मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. पण सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरलेला आहे. रस्त्यावरून जात असताना रोज किमान एकतरी दुचाकीस्वार पडून किरकोळ दुखापत होऊ लागली आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करावी आणि याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
– वैभव पाटील, नंदीहळळी









