लोकांनी, विशेषत: युवकांनी दिवसाला किंवा सप्ताहात किती तास काम करावे, यावर सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. 70 तासांपासून 100 तासांपर्यंतचा कालावधी दिला जात आहे. त्यावर काही जणांनी टीकाही केली आहे. तथापि, काही ‘कर्मभक्त’ किंवा वर्कोहॉलिक लोकांना हे सांगावेही लागत नाही. ते दिवसातूत 12 तास कामात गुंतलेले असतात. सध्या अमेझॉन कंपनीच्या एका कर्मचाऱ्याची व्हिडीओ पोस्ट गाजते आहे. या कर्मचाऱ्याने आपले खरे नाव स्पष्ट पेलेले नाही. मात्र, आपण दिवसाला 14 तास काम करतो, असे प्रतिपादन केले आहे. याचा अर्थ असा की, आठवड्यात एक दिवस सुटीचा सोडला तर, हा कर्मचारी एक आठवड्यात तब्बल 84 तास काम करतो, असे दिसून येते.
या कर्मचाऱ्याची कामभक्ती अचाट आहे. त्याचा विवाह झाला आहे. त्याला एक कन्याही आहे. पण आपल्या कन्येचा जन्म होत असतानाही तो आपल्या कामात होता. ही माहिती त्याने स्वत:च प्रसिद्ध केली आहे. त्याचे कामही बैठ्या स्वरुपाचे आहे. तो प्रतिदिन सकाळी 7 वाजता कामाला प्रारंभ करतो. रात्री 10 वाजता त्याचे काम संपते. मधला एक जेवणाचा आणि खाण्याचा मिळून एक तास वगळता तो सातत्याने कामातच असतो. अर्थातच, त्याला वेतनही तसेच भरभक्कम, म्हणजे वर्षाला 7 कोटी रुपयांचे आहे. पण या वेतनाचा उपभोगही तो घेऊ शकत नाही.
पण आता त्याला काही बाबी उमगायला लागल्या आहेत. इतके कामाला जुंपून घेणे योग्य नाही. थोडा वेळ तरी स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबियांना देणे आवश्यक आहे. शरीर प्रकृती सुदृढ राखण्यासाठी विश्रांतीचीही आवश्यकता आहे. तसेच, केवळ काम आणि वेतन या चक्रात अडकून न पडता, इतर काही छंद किंवा आवडी जोपासण्याची आवश्यकता असते हे त्याला पटू लागले आहे. सतत कामात राहण्याची सवय चांगली असली तरी, केवळ पैसा भरपूर मिळतो, म्हणून तशाच कामात आयुष्य घालविणे शक्य होणार नाही, याची त्याला जाणीव होऊ लागली आहे, अशीही भावना त्याने व्यक्त केली आहे. एकंदर, काम आणि इतर आयुष्य यांची यथायोग्य सांगड घातल्याचे समाधान मिळते, हे जाणणे आवश्यक आहे.









