क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक वरिष्ठ साखळी स्पर्धेत फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात निपाणी फुटबॉल अकादमीने टीएफए संघाचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. 70 किलोमीटर प्रवास करून बेळगाव शहरात स्पर्धेत सहभाग घेऊन बेळगावच्या दिग्गज संघांचा पराभव करीत अजिंक्यपद पटकाविल्याबद्दल निपाणी संघाचे भव्य दुचाकी रॅली काढून या संघाचे जल्लोषात निपाणी येथे स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सायंकाळी निपाणी परिसरात पावसाने हजेरी लावली होती. निपाणीच्या फुटबॉल संघटनेने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविल्याबद्दल दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पावसामुळे रॅली रद्द होण्याची शक्यता होती. पण उत्साही फुटबॉल शौकीनांनी या रॅलीत सहभाग घेतला. रॅली भाजी मार्केट येथील कार्यालयापासून सुरूवात करण्यात आली.
व्यायाम शाळा मैदान, शिवाजी चौक, चाटे मार्केट, शुभरत्न केंद्र, कोठीवाले खुट, गांधी चौक, महादेव गल्ली, जत्रटवेस, अशोकनगर, साखरवाडी मार्गे, साईशंकर नगर येथील साई मंदिरापर्यंत या रॅलीची सांगता करण्यात आली. प्रथम व्यायाम शाळेच्या कार्यालयापासून पूजन करून व फटाक्यांची आतिषबाजी करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिवादन केले. मोतीवाला शास्त्राr यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरात महाआरती करून महादेव मंदिर येथे चषकाचे पूजन नगरसेवक सुनील पाटील, संजय मोळवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अशोक नगर येथील राजमणी ग्रुपच्या कार्यालयाजवळ जल्लोषात स्वागत करण्यात आले. वीर राणी चन्नम्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साखरवाडी हनुमान मंदिर व साई मंदिर येथे पूजन करण्यात आले. रॅलीपूर्वी बसवप्रसाद जोल्ले व माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी बाबा लॉन येथे खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनील सप्ले, सोमनाथ शिंदे, रत्नशात्री एच. ए. मोतीवाला, सुरज राठोड, अक्षय जयकर, राहुल निंबाळकर, सुधाकर सोनालकर, रमेश जयकर, प्रतिक्षा अक्षय, उपाध्येय व रणजीत माने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व खेळाडू व फुटबॉल संघटनेचे संस्थापक व प्रशिक्षक यांनी फुटबॉल संघाचा आजपर्यंतचा आढावा घेतला.
अध्यक्ष धनंजय मानवी यांनीही या संघाला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोझा, सचिव अमित पाटील, अग्नेलो रेगो, अमीन पिरजादे, गडहिंग्लजचे प्रशिक्षक दीपक कुप्पण्णवर यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला निपाणी भागातील सर्व आजी माजी खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.









