ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील पारगे नगरमध्ये फर्निचरच्या गोडाऊनला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 फायरगाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पारगे नगर येथील एका फर्निचरच्या गोदामाला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामात लाकडासह सोफ्याचे साहित्य असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाडय़ा दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहेत. मात्र, अद्यापही आग नियंत्रणात आली नाही. त्यामुळे अग्निशमन दलाचीही दमछाक होत आहे. आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीत मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.








