‘शहेनशाह बच्चन नाईट’ कार्यक्रमाद्वारे अजरामर गीतांचा नजराणा
बेळगाव : चमचमीत पदार्थांची मेजवानी रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवाने बेळगावकर खवय्यांना मिळवून दिली आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने खाद्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. अन्नोत्सवातील प्रत्येक स्टॉलवर प्रचंड गर्दी झाली होती. अन्नोत्सवाकडे जाणारे मार्ग गर्दीने फुलले होते. त्यामुळे शनिवार-रविवार सलग दोन दिवस येथे गर्दीचा महापूर पाहावयास मिळाला. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने अन्नोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. 14 जानेवारीपर्यंत अंगडी कॉलेज ग्राऊंड, नानावाडी येथे भव्य अन्नोत्सव भरविण्यात आला आहे. दरवर्षी स्टॉलची संख्या वाढत गेल्याने प्रशस्त जागेमध्ये यावर्षीचा अन्नोत्सव भरविण्यात आला आहे. नागरिकांची गर्दी पाहता दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी मोठी पार्किंग व्यवस्था केली आहे. एकूण 186 स्टॉल असून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य स्टेज उभारला आहे.
63 स्टॉल मांसाहारी खाद्यपदार्थांसाठी ठेवण्यात आले आहेत, तर 51 स्टॉलवर शाकाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 72 स्टॉल्सवर गृहोपयोगी वस्तू विक्री केल्या जात आहेत. चटपटीत पुरीभाजी, पाणीपुरी, वडापावपासून कोंबडीवडे, चायनीज, तंदुरी, नॉर्थ इंडियन खाद्यपदार्थांचा समावेश स्टॉलवर करण्यात आला आहे. शाकाहारीसह मांसाहारी खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी गर्दी वाढत आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांवर आधारलेल्या अजरामर गीतांचा नजराणा रविवारी सादर करण्यात आला. ‘शहेनशाह बच्चन नाईट’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. खाद्यप्रेमींनी संगीताचा आस्वाद घेत गुलाबी थंडीत चटपटीत खाद्यपदार्थांवर ताव मारला.









