हजारो भाविकांच्या उपस्थितीत इंगळ्यांचा अभूतपूर्व सोहळा : सनई-चौघडांच्या मंगल निनादात पालखीचे आगमन
वार्ताहर/काकती
येथील जागृत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानात इंगळ्यांचा कार्यक्रम शुक्रवार दि. 4 रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी जनसागर लोटला होता. गुरुवार दि. 3 रोजी सिद्धेश्वर मंदिरातून सायंकाळी सनई-चौघड्यांच्या निनादात पालखी सोहळ्याचे आगमन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री रुद्रपाक देवस्थानात झाले. हिरेमठ स्वामींच्या सानिध्यात हक्कदार, मानकरी, देवस्थान पंच आदींच्या उपस्थितीत देवाची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखविला. तेथून देवाची पालखी सवाद्य मिरवणुकीने सिद्धेश्वर देवस्थान आली. गाऱ्हाणे घालून पालखीचा मंदिरात प्रवेश झाला.
आंबिल-गाड्यांचा मान, औक्षण
गुरुवारी सायंकाळी आंबिल गाड्यांची घरोघरी सुवासिनींनी पंचारती केली. देवस्थानचे हक्कदार, पुजारी, सवाद्य मिरवणुकीने प्रथम सांगली सरकारचा मानाचा गाडा आणण्यासाठी हक्कदार चौगुले, सनदी यांच्या निवासस्थानातून निघाला. अशा प्रकारे तिन्ही गाडे वतनदारांचे असून या गाड्यांना प्रथम मान देण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. गावातील गाडे, आंबिल-घुगऱ्या घेऊन सहभागी झाले होते. सिद्धेश्वर मंदिराला सवाद्य प्रदक्षिणा घालून आंबिल-घुगऱ्याचा प्रसाद भाविकांना वाटला.
शोभा गाड्यांची विलोभनीय मिरवणूक
गुरुवारी रात्री गाड्यांचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रत्येक गल्लीच्या मंडळाने विविध कलाकुसरीने, आकर्षक विद्युत रोषणाईने गाडे सजविले होते. यंदा खास आकर्षण म्हणजे शोभा गाड्यांना व मिरवणुकीत दिमाखदार बैलजोड्या होत्या. वाद्यांच्या ताफ्यात युवावर्ग गुलालाची उधळण मोठ्या उत्साहाने करीत होते. रात्री उशीरा शोभागाड्यांची मिरवणूक मंदिर प्रांगणात पोहचली. धार्मिक मुहूर्ताच्या विधिवत इंगळ्यांची लाकडे प्रज्वलीत करण्यात आली. शोभा गाड्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून शुक्रवारी 9 वाजता सांगता झाली.
मनोज्ञ दर्शन घडविणारा इंगळ्यांचा सोहळा
शुक्रवारी सायंकाळी देवस्थानचे हिरेमठ स्वामी यांचे मंदिरात सवाद्य आगमन झाले. मंदिराच्या दक्षिण प्रांगणातील गदगेवर स्वामी विराजमान झाले. देवस्थान पंच, हक्कदार, मानकरी यांनी स्वामीची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतले. इंगळ्यांच्या धार्मिक विधिवत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देवस्थानचा नंदीकोळ, कणबर्गी सिद्धेश्वराचा नंदीकोळ, सांभाळ, धुपारती, घंटानाद, शंखनाद, हक्कदारी, मानकरी आदी यजमान भाविकांनी मुहूर्ताच्या घटकेनुसार अग्निकुंडाला प्रदक्षिणा घातल्या. यावेळी भाविकांनी हर हर सिद्धेश्वराच्या जयघोषात पेटलेल्या इंगळ्यांतून धूम ठोकली. शुक्रवारी पहाटेपासून मंदिरात महाभिषेकसह दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. मागणी केलेल्या भाविकांनी दीड नमस्कार व तुलाभार देवाला अर्पण केले.
आज जंगी कुस्त्याचे मैदान
शनिवार दि. 5 रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन अष्टगीर आमराईतील आखाड्यात सायंकाळी 4.30 वाजता केले आहे. प्रसिद्ध पैलवानाच्या निकाली कुस्त्या होणार आहेत. प्रथम क्रमांकाची कुस्ती हरियाणा चॅम्पियन हरिषकुमार व बेळगावचा मल्ल कामेश पाटील-कंग्राळी खुर्द यांच्यात होणार असून महिला कुस्तीपटूंचीही लढत रंगणार आहे.









