22-24 मेदरम्यान होणार आयोजन : मरीन अन् एनएसजी कमांडोंना केले जाणार तैनात
वृत्तसंस्था/ श्रीनगर
श्रीनगरमध्ये 22-24 मेपर्यंत आयोजित होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला जात आहे. परिषदेचे आयोजन डल सरोवराच्या काठावरील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये केले जाणार आहे. यादरम्यान झेलम नदी आणि डल सरोवरात मरीन कमांडोंना (मार्कोस) तैनात केले जाणार आहे. संभाव्य आत्मघाती हल्ले रोखण्यासाठी एनएसजीचे पथके कार्यक्रमस्थळी तैनात असतील आणि त्यांच्यासोबत एसओजी देखील असणार आहेत.

तर बैठकीपूर्वी काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडित आणि बिगर मुस्लिमांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. हे नागरिक तात्पुरत्या स्वरुपात जम्मू येथे राहण्यासाठी गेले आहेत. सुरक्षा अधिकाऱ्यांनी काश्मिरी पंडित आणि अन्य बिगरमुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालय आणि घरांपुरतीच मर्यादित राहण्याची आणि अनावश्यक स्वरुपात बाहेर न पडण्याची सूचना केली आहे. या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने आम्हाला अन्यत्र जाण्यास सांगितलेले नाही, परंतु आम्हाला सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एखाद्या मोठ्या कार्यक्रमापूर्वी अल्पसंख्याकांना (हिंदू अन् शीख) लक्ष्य करण्यात आल्याची अनके उदाहरणे आमच्यासमोर आहेत. बैठक समाप्त झाल्यावरच आम्ही खोऱ्यात परतणार आहोत असे एका काश्मिरी पंडित असलेल्या कर्मचाऱ्याने म्हटले आहे.
गस्त वाढविण्याचे पाऊल
श्रीनगर शहरात हायटेक ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून अनेक ठिकाणी सुरक्षा चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. पोलीस आणि सीआरपीएफने श्रीनगरसोबत आसपासच्या जिल्ह्यांमधील गस्त वाढविली आहे. सीआरपीएफचे पथक कार्यक्रमस्थळी विशेष श्वानांच्या मदतीने स्फोटकांचा शोध घेण्याचा सराव करत आहे. श्रीनगर आणि कार्यक्रमस्थळी साध्या वेशात पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच सुरक्षा दलांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
सौंदर्यीकरणाचे कार्य
बैठकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरच्या सौंदर्यात भर घातली जात आहे. अनेक ठिकाणी निर्मितीकार्ये हाती घेण्यात आली आहेत. जुन्या बंकर्सना आतून स्मार्ट तर बाहेरून सुंदर स्वरुप दिले जात आहे. नवे बंकर्स बुलेटप्रूफ शील्डद्वारे तयार केले जात असून त्यामागे सँडबॅग ठेवण्यात येत आहे. बंकर्सच्या बाहेरील हिस्स्याला काश्मीरमधील पर्यटनस्थळांच्या चित्रांनी सजविण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून कट
काश्मीरमधील जी-20 ची बैठक रोखण्यासाठी पाकिस्तान कट रचत आहे. पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांनी काश्मीरमधील फुटिरवादी संघटना ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आहे. हुर्रियत नेत्यांशी काश्मीरसंबंधी चर्चा केल्याचे भुट्टो यांनी ट्विट करत म्हटले आहे. बिलावल यांनी यापूर्वी जी-20 च्या बैठकीच्या मुद्द्यावरून चीन आणि अनेक मुस्लीम देशांच्या राजदूतांची भेट घेतली आहे. चीन आणि तुर्किये यांनी काश्मीरमध्ये होणाऱ्या जी-20 बैठकीत भाग घेऊ नये याकरता पाकिस्तान प्रयत्नशील आहे. तर काश्मीरमधील जी-20 बैठकीत भाग घेणार असल्याचे जाहीर करत ब्रिटनने पाकिस्तानला झटका दिला आहे.









