घरात एकूण 200 प्रकारच्या बाहुल्या
जगात लोकांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासताना पाहिले असेल. कुणी नाणी जमवित असते, तर कुणी रंगीत दगडांचा संग्रह करत असतो. काही लोकांना जुन्या गोष्टी संग्रही ठेवण्याचा छंद असतो. अशाच प्रकारचा एक छंद डुआने एजे नावाच्या व्यक्तीला वयाच्या 5 व्या वर्षापासून जडला आहे. त्याच्या या छंदाची लोक चेष्टा करायचे.
तुम्ही मुलींना बाहुल्यांसोबत खेळताना पाहिले असेल. मुलींना स्वत:च्या बाहुलीला सांभाळून ठेवण्याचा छंद असतो. तर मुलांना सहसा कार्सचा संग्रह करण्याची आवड असते. परंतु एका इसमाने वयाच्या 5 व्या वर्षापासून बाहुल्यांसोबत खेळण्याचा छंद जोपासला आहे. आता या व्यक्तीकडे 200 बाहुल्यांचे कलेक्शन आहे.

मला वयाच्या 5 व्या वर्षी पहिली बाहुली मिळाली होती, जी मला अत्यंत आवडली होती. यानंतर मी बाहुल्यांचा संग्रह करण्यास सुरुवात केली होती असे डुआने एज यांनी सांगितले आहे. डुआने हे ई-बे यासारख्या साइट्सवरुन बाहुल्या खरेदी करतात आणि त्यांना स्वत:च्या 38 हजार सोशल मीडिया फॉलोअर्ससोबत शेअर करत असतात. त्यांच्या या छंदावरून लोक अणि त्यांचे मित्र देखील चेष्टा करायचे. परंतु घरात प्रत्येक सणावेळी त्यांना बाहुलीच भेटवस्तू म्हणून दिली जात होती. या बाहुली शाळेत घेऊन गेल्यावर मुले त्यांची चेष्टा करू लागल्यावर त्यांनी असे करणे बंद केले होते.
दर महिन्याला खरेदी करतात बाहुली
आता 34 वर्षांचे झालेले डुआने दर महिन्याला बाहुल्या खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यांच्याकडे जपानी स्मार्ट डॉल्स देखील आहेत आणि ते त्यांच्यासाठी हजारो रुपयांच्या अॅक्सेसरीज देखील खरेदी करत असतात. डुआने हे स्वत:च्या 3 बेडरुम असलेल्या घरात राहतात आणि त्यांची एक खोली केवळ बाहुल्यांनी भरून गेलेली आहे. निक नावाचा त्यांचा जोडीदार असून त्याला डुआनेच्या या छंदाबद्दल कुठलाच आक्षेप नाही.









