62 लाख रुपयांची रोकड, कोट्यावधीचे दागिने जप्त
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामच्या नागरी सेवा अधिकारी नुपूर बोरा यांना बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बोरा यांच्या घरातु कोट्यावधी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. जमीनसंबंधी वादग्रस्त व्यवहारांप्रकरणी नुपूर बोरा यांच्यावर 6 महिन्यांपासून कायदेशीर स्वरुपात नजर ठेवली जात होती. बोरा यांनी आर्थिक लाभाच्या बदल्यात हिंदूधर्मीयांची जमीन संशयास्पद लोकांच्या नावावर केल्याचा आरोप असल्याचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले आहे.
31 मार्च 1989 रोजी जन्मलेल्या नुपूर बोरा या गोलाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या आसाम नागरी सेवा अधिकारी असून 2019 मध्ये त्या रुजू झाल्या होत्या. सध्या त्या कामरुप जिल्ह्यात गोरोईमडी येथे सर्कल ऑफिसर म्हणून नियुक्त होत्या. गुवाहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी मिळविलेल्या बोरा नागरी सेवेत येण्यापूर्वी व्याख्यात्या राहिल्या आहेत.
प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात नुपूर यांनी कार्बी अंगलोंगमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून केली होती. मार्च 2019 ते जून 2023 पर्यंत त्या या पदावर राहिल्या. जून 2023 मध्ये त्यांना बारपेटा येथे सर्कल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले, यानंतर त्यांची बदली कामरूप येथे करण्यात आली होती. केवळ 6 वर्षांच्या सेवेत बोरा यांनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप आहे. बोरा यांच्या गुवाहाटी येथील निवासस्थानातून 92 लाख रुपयांची रोकड आणि 2 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याचबरोबर आणखी तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
बोरा यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप असून चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही आणखी रोकड आणि अन्य गोष्टी जप्त करू शकतो असे पोलीस अधीक्षक रोज कलिता यांनी सांगितले आहे. नुपूर बोरा यांच्या विरोधात कृषक मुक्ती संग्राम समितीकडून तक्रार करण्यात आली होती. जमिनीशी निगडित सेवांसाठी त्यांनी रेटकार्ड तयार केल्याची तक्रार होती. बोरा या 1500 रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंतची लाच मागत होता असा तक्रारदाराचा दावा आहे.









