झोपडीत राहणाऱ्या लोकांना दोन वेळचे अन्नही पोटभर मिळत नाही, अशी माध्यमवर्गीय किंवा श्रीमंतांची समजूत आहे. बहुतेक वेळा ती खरीही असते. अपवाद केवळ मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या काही जणांच असू शकतो. कारण तिथे जागेची टंचाई असल्याने किंवा उपलब्ध जागा विकत घेण्याची ऐपत नसल्याने बऱ्यापैकी सधन असणाऱ्यांनाही झोपडीत रहावे लागू शकते.
पण हरियाणातील गुरुग्राम या मोठ्या शहरात एका झोपडीत संपत्तीचे भांडार हाती लागले आहे. एका मोठ्या पत्र्याच्या पेटीत ही संपत्ती पोलिसांना आढळून आली. त्याचे असे झाले की, पोलिसांना या झोपडपट्टीत अंमली पदार्थ तयार केले जातात आणि विकले जातात अशी माहिती मिळाल्याने त्यांनी धाड टाकली. झोपड्यांचा तपास करताना एका झोपडीत पत्र्याच्या पेटीत जवळपास 5 किलो सोने आणि चांदीचे दागिने, तसेच जवळपास 13 लाख रुपयांची रोख रक्कम हाती लागली. ती जप्त करण्यात आली असून झोपडीत राहणाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थ विकून ही संपत्ती कमावल्याचा संशय आहे









