बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडवर 3-2 ने मात, अनमोल खर्बकडून पुन्हा चमकदार कामगिरी
प्रतिनिधी/ शाह आलम (मलेशिया)
अनमोल खर्बने पुन्हा एकदा महत्त्वाची कामगिरी करताना पाचवी लढत जिंकून दिल्याने भारतीय महिलांनी बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेचे ऐतिहासिक जेतेपद मिळवताना रविवारी थायलंडचा 3-2 असा पराभव केला. अनुभवी पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघातील तऊण गटाने दोन वेळचे कांस्यपदक विजेते थायलंडला नमवताना अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.
भारतीय महिलांसाठी सांघिक स्पर्धेतील हे पहिलेच मोठे विजेतेपद आहे आणि 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या उबेर चषकापूर्वी संघाला मिळालेली ही मोठी चालना आहे. भारताने यापूर्वी 2016 आणि 2020 च्या आवृत्त्यांमध्ये पुऊष संघाच्या माध्यमातून दोन कांस्यपदके जिंकली होती. भारतीय बॅडमिंटनसाठी हा एक खास क्षण आहे, असे भारताचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी सांगितले. जरी स्पर्धेतील बहुतेक संघांप्रमाणे थायलंडही पूर्ण ताकदीने उतरलेले नसले, तरी त्यांच्या संघात उच्च दर्जाचे खेळाडू होते.
थायलंडला जागतिक क्रमवारीत 13 व्या क्रमांकावर असलेली रत्चानोक इंतानोन आणि 16 व्या क्रमांकावर असलेली पोर्नपावी चोचुवाँग या त्यांच्या अव्वल दोन एकेरी खेळाडूंशिवाय उतरावे लागले. दोन वेळा ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेल्या आणि दुखापतीमुळे चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या सिंधूने भारताला आत्मविश्वासपूर्ण सुऊवात करून देताना पहिल्या एकेरीत जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असलेल्या सुपानिडा कातेथाँगला 21-12, 21-12 असे पराभूत केले.
त्यानंतर जागतिक क्रमवारीत 23 व्या क्रमांकावर असलेली जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी आणखी एक दमदार कामगिरी करताना जोंगकोल्फान कितिथारकुल आणि रविंदा प्रा जोंगजाई या जगातील 10 व्या क्रमांकाच्या जोडीला 21-16, 18-21, 21-16 असा धक्का देत भारताला वर्चस्व मिळवून दिले. जागतिक क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर असलेल्या बुसानन ओंगबामऊंगफानविऊद्ध दुसरी एकेरी लढत खेळताना शनिवारी माजी विश्वविजेत्या नोझोमी ओकुहाराविऊद्ध अप्रतिम विजय नोंदविलेल्या अश्मिता चालिहाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु अश्मिताने केलेल्या चुकांमुळे तिला तिच्या अनुभवी प्रतिस्पर्ध्याविऊद्ध 11-21, 14-21 असा पराभव पत्करावा लागला. .युवा श्रुती मिश्रा आणि प्रिया कोन्जेंगबम या वरिष्ठ राष्ट्रीय विजेत्या जोडीला अपेक्षेप्रमाणे जागतिक क्रमवारीत 13 व्या क्रमांकावर असलेल्या बेन्यापा एम्सार्ड आणि नुंटाकर्ण एम्सार्ड यांचे आव्हान जड जाऊन त्यांना 29 मिनिटांत 11-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला. 2-2 अशी बरोबरी झालेली असताना अनमोलने भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी पुन्हा आपल्या खांद्यावर घेतली आणि तिने निर्णायक तिसऱ्या एकेरीत जागतिक क्रमवारीत 45 व्या स्थानावर असलेल्या पोर्नपिचा चोईकीवोंगवर वर्चस्व राखत 21-14, 21-9 असा विजय मिळवला. या विजयानंतर लगेच सेटिया सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये महिला बॅडमिंटन संघाने हे यश साजरे करण्यास सुरुवात केली आणि अनमोलला उचलून धरण्यासाठी संपूर्ण संघ धावून आला.









