सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेची सामाजिक बांधिलकी
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील पितृछत्र हरवलेल्या तीन विद्यार्थ्यांनी ‘आमचा आधार हरवलाय, आम्हाला शिक्षणासाठी मदतीची गरज आहे’ अशी आर्त हाक मारताच सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्था या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आली. या संस्थेच्यावतीने आरोस येथील या गरीब मुलांना आर्थिक मदतीसह डॉ बाबासाहेब आंबेडकर आत्मचरित्र व फाईल फोल्डर देण्यात आले.
आरोस येथील संतोष राघोबा आरोसकर हे आपल्या कुटुंबीयांसह गोवा येथे राहत असताना त्यांचे एक महिन्यापूर्वी आकस्मित निधन झाले. त्यामुळे त्यांच्या सायली आरोसकर (१२वी), विणा आरोसकर (१०वी), संस्कार आरोसकर (७वी) या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा मार्ग बिकट बनला होता. या तिन्ही मुलांनी ‘आमचा आधार हरवलाय, आम्हाला शिक्षणासाठी मदतीची गरज आहे’ असे समाजातील सर्व घटकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देतसेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेने ही मदत केली आहे.
सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत कदम, सचिव मोहन जाधव, कार्याध्यक्ष तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, श्रद्धा कदम, रमेश कदम, सिद्धार्थ कदम, नरेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी सूर्यकांत कदम यांनी शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये हेच संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे सांगून या उद्देशातूनच या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली असून डॉ. बाबासाहेबाचा आदर्श समोर ठेऊन गुणवत्तापूर्वक शिक्षण घ्या असे आवाहन केले. यावेळी अरविंद वळंजू, मोहन जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या तिन्ही विद्यार्थ्यांची आई रुक्मिणी ओरोसकर आणि सायली ओरोसकर यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षणासाठी मदत केल्याबद्दल संस्थेबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी दीपक पडेलकर, भिकाजी वर्देकर, पी. एल. कदम, ममता मोहन जाधव, सागर शशिकांत गमरे, कांता जाधव, सिद्धार्थ कदम, निखिल अनंत कदम, ओंकार तुळसुलकर, सिद्धार्थ गोपाळ तांबे, डॉ. महेश पेडणेकर, सिद्धार्थ भिवा जाधव आदिंचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संस्थेचे सचिव मोहन जाधव यांनी तर आभार वासुदेव जाधव यांनी मानले.
मदतीचे आवाहन
पितृछत्र हरवलेल्या तिन्ही विद्यार्थ्यांना ज्या समाजसेवी संस्था व दात्यांना मदत करावयाची आहे त्यानी खालील बँक खात्यावर मदत जमा करावी. सायली संतोष आरोसकर बँक – बँक ऑफ बडोदा शाखा – वेर्णा (गोवा) आय एफ एस सी कोड – बी ए आर बी ओ डी बी व्ही ई आर ई खाते नं ८८८५०१००००६५०६ संपर्क क्र ८४११९३३३५७









