
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शुक्रवारी जड अंतःकरणाने गणरायाला निरोप देण्यात आला. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंतबाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ, सुळेभावी, करडीगुद्दी आदी गावांमध्ये सकाळपासून घरगुती गणपती विसर्जनाला प्रारंभ करण्यात आला. यंदा सर्व विहिरी व तलाव भरले असल्याने भाविकांनी गावानजीकच्या विहिरीत व तलावात गणरायाचे विसर्जन केले. ट्रक्टर, टेम्पो, रिक्षा व इतर वाहनांतून तसेच पायी चालत घरगुती गणपती नेण्यात येत होते. फटाक्यांची आतषबाजी करीत व गणपतीबाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात येत होता.
दुपारनंतर सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. दुपारी पावसानेही हजेरी लावली. मंडळांनी यंदा पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता. भजनी मंडळ, झांज पथक, ढोल पथक आदी वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात येत होती. काही मंडळांकडून सजविलेल्या बैलजोडय़ांच्या सहभागामुळे विसर्जन मिरवणुकीची शोभा आणखीनच वाढली होती. सार्वजनिक गणपतींचे विसर्जन गावानजीकच्या तलावामध्ये करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. मारीहाळ पोलिसांनी प्रत्येक गावामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे शांततेत श्री विसर्जन मिरवणूक पार पडली.









