एसआयटीच्या स्थापनेची याचिकाकर्त्यांची मागणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या निवडणूक रोखे प्रकरणाची चौकशी विशेष अन्वेषण दलाच्या (एसआयटी) माध्यमातून केली जावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 22 जुलैला सुनावणी करणार आहे. राजकीय पक्षांना कंपन्यांकडून राजकीय निधी संकलित करणे सोयीचे व्हावे, यासाठी केंद्र सरकारने ही योजना 2019 मध्ये लागू केली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ही योजना घटनाबाह्या असल्याचे स्पष्ट करत रद्द केली होती.
या योजनेच्या माध्यमातून अनेक उद्योगपतींनी राजकीय पक्षांना देणग्या दिल्याचे स्पष्ट झाले होते. राजकीय पक्षांकडून काही आश्वासने किंवा सवलती घेऊन या देणग्या दिल्याचा आरोप केला जात होता. हे साटेलोटे उघड करण्यासाठी या देणग्यांची चौकशी न्यायालयाने स्वत:च्या देखरेखीत विशेष अन्वेषण दल (एसआयटी) स्थापन करून करावी, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका सादर करण्यात आल्या होता. या याचिकांवर सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले असून ही सुनावणी 22 जुलैला होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 22 जुलैच्या सूचीत या याचिकांचा समावेश करण्यात आला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. परदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी केली जाईल.
बिगरसरकारी संस्थांचा आरोप
राजकीय पक्षांना देणग्या देणारे उद्योगपती आणि त्यांच्या कंपन्यांना सरकारांकडून मिळालेली कामे यांच्यात संबंध असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही निवडणूक रोखे योजना हा एक मोठा घोटाळा आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुनच सर्व देणगीदार आणि त्यांनी देणग्या दिलेल्या राजकीय पक्षांची माहिती काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केली होती. आता हा वाद पुढच्या अवस्थेला पोहचला असून सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पैसा वसूल करण्याचीही मागणी
ज्या देणग्या अशा साटेलोटे पद्धतीने (क्वीड प्रो क्वो) देण्यात आल्या आहेत, त्यांचा पैसा संबंधित राजकीय पक्षांकडून वसूल करण्यात यावा, असा आदेश तपास यंत्रणांना देण्याची मागणीही या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या न्यायालयाच्या देखरेखीत चौकशीचा आदेश देण्यात आला होता. त्याचप्रमाणे या योजनेचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी आहे.









