नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात ‘लम्पी’ या गुरांना होणाऱया त्वचारोगाने थैमान घातले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये या रोगामुळे हजारो गाईगुरे मृत्यूमुखी पडली आहेत. आता हे प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात पोहचले असून 31 ऑक्टोबरला त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
बुधवारी या संबंधीची याचिका तातडीच्या सुनावणीसाठी देशाचे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांच्या खंडपीठासमोर आली होती. या रोगाची लागण झाल्याने आतापर्यंत 67 हजार गायींचा मृत्यू झाला आहे. हा संसर्गजन्य रोग असून तो एका जनावराकडून दुसऱया जनावरापर्यंत झपाटय़ाने पसरतो. त्यामुळे त्यावर तातडीने उपाय योजना करण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या रोगाचा प्रसार डास, माशा, गोचीड आदींमुळे झपाटय़ाने होतो. तसेच तो दूषित पाणी आणि पशूखाद्यामुळेही पसरतो, असे संशोधनात आढळल्याची माहिती याचिकेत देण्यात आली आहे.
लसीची निर्मिती
या रोगावर भारतातच स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात आली आहे. ही लस लवकरच सर्वत्र उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सरकारने दिली आहे. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयातही पोहचले असून 28 सप्टेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे उत्तर मागविले होते. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले असून निर्णयाची प्रतीक्ष देशभरात केली जात आहे.









