पाटण :
पाटणमध्ये प्रवेश करतानाच मुख्य रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा सर्वांचे लक्ष वेधून घेत असून परिसरात या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात घंटागाडी फिरत असताना देखील बेजबाबदार नागरिक व व्यावसायिकांनी उघड्यावर टाकलेल्या कन्त्रयामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत असून नगरपंचायतीने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पाटण नगरपंचायतीने घंटागाडीची व्यवस्था केली आहे. दरदिवशी पाटण शहरातील प्रत्येकाच्या दारात गाडी जाते. त्या गाडीतून कचरा गोळा केला जातो व त्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र काही महाभाग रस्त्याच्या कडेला जाणून बुजून कचरा टाकत आहेत स्वच्छतेच्या दृष्टीने याला आळा घालणे गरजेचे आहे.
कोकणात जाताना केरा पुलावरून पाटण मध्ये प्रवेश करतानाच असंख्य प्रवाशांना, वाहनधारकांना, पर्यटकांना पडलेला दुर्गंधीयुक्त कचरा सगळ्यांच्या दृष्टीस पडतो. रस्त्याच्या कडेने ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी चालत प्रवास करतात. परंतु सामाजिक भान हरपलेल्या नागरिकांना उघड्यावर कचरा टाकताना काहीच वाटत नाही याचे मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्वच्छतेबाबत अनेक वेळा शहरामध्ये नगरपंचायतीकडून घंटा गाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम चालू असते. मात्र काही जणांकडून याचा अवलंब केला जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोन दिवसावर गणेशोत्सव आला असून सर्वजण स्वच्छतेला महत्व देत असताना कराड- चिपळूण रस्त्यावर पडलेला कचरा म्हणजे आजाराला निमंत्रण देत आहे. स्वच्छतेचे नियम मोडणारे व उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर बाबतीत नगरपंचायतीने गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








