20 लाखांहून अधिक किमतीचे दागिने जप्त : कित्तूर पोलिसांची कामगिरी
बेळगाव : चोऱ्या, घरफोड्यांप्रकरणी कित्तूर पोलिसांनी रुक्मिणीनगर, बेळगाव येथील एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याजवळून 20 लाख 30 हजार रुपये किमतीचे 203 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. नितेश ऊर्फ दीपू जगन्नाथराव ढाफळे (वय 42) राहणार रुक्मिणीनगर असे त्याचे नाव आहे. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूरचे मंडल पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. बी. वस्त्रद, एस. ए. दफेदार, एन. आर. गळगी, ए. एम. चिक्केरी, एस. एम. पेंटेद, आर. एस. सिली, एस. बी. हुनशीकट्टी, एस. आर. पाटील, राजू गौरप्पन्नवर, एम. सी. इटगी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
तांत्रिक पद्धतीने तपास करून पोलिसांनी नितेशच्या मुसक्या आवळल्या आहेत. याकामी तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नवर, सचिन पाटील आदींचीही मदत लाभली आहे. नितेश ऊर्फ दीपू हा एक अट्टल गुन्हेगार असून त्याने कित्तूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 3, बैलहोंगल व हुक्केरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी 1 असे एकूण 5 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. विद्यागिरी-कित्तूर येथील प्रवीण शंकर इटगी यांच्या बंद घराच्या पाठीमागचा दरवाजा फोडून तिजोरीतील प्रत्येकी 35 ग्रॅम सोन्याचे दोन गंठण, 10 ग्रॅमची कर्णफुले, 5 ग्रॅमची रिंग, 10 ग्रॅमची आणखी एक कर्णफुले, 5 ग्रॅमची अंगठी असे एकूण शंभर ग्रॅम सोने व 500 ग्रॅम चांदी असे दागिने व 5 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम असा 11 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविण्यात आला होता. यासंबंधी 8 जुलै 2024 रोजी कित्तूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना कित्तूर पोलिसांनी नितेशला अटक करून 20 लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.









