लोकशाही पायदळी तुडवून इतर भाषिकांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून मुठभर कन्नड दुराभिमान्यांनी शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी महानगरपालिकेसमोर जाऊन निदर्शने करून महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार कन्नड करावा, अन्यथा काळे फासू, अशी फुशारकी मुठभर कन्नड दुराभिमान्यांनी पोलीस संरक्षणात केली आहे. महानगरपालिकेच्या सभेमध्ये मराठी आणि हिंदी भाषेमध्ये अधिक चर्चा झाली. त्यामुळे पोटशूळ उठले असून त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे. सीमाभागामध्ये आणि विशेषकरून बेळगाव शहरामध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी मराठीमध्येच फलक लावले आहेत. तर प्रशासनानेही तिन्ही भाषांमध्ये फलक लावले आहेत. मात्र जाणूनबुजून मराठी भाषिकांना त्रास देण्यासाठी मुठभर कन्नड दुराभिमान्यांनी हा प्रकार सुरू केला आहे. यामुळे शहरातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी कायद्यानुसार त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मराठी भाषिकांनी जर कोणतेही आंदोलन किंवा महामेळावा केला तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. मात्र शहरातील जनतेला वेठीस धरूनही अशांवर गुन्हे दाखल होत नाहीत. यामुळे कर्नाटकमध्ये लोकशाही आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरुवारी महापालिकेसमोर जाऊन केवळ पाच ते सहा जणांनी धिंगाणा घातला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. जर त्याचवेळी त्यांना योग्य धडा शिकविला असता तर यापुढे अशा घटना घडणार नाहीत, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. या प्रकाराकडे आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.









