इस्लामपूर / युवराज निकम :
वाळवा तालुक्यात किंबहुना सांगली जिल्ह्यात आतापर्यंत आ. जयंत पाटील यांनी बेरजेचे राजकारण केले. पण अलिकडील काळात त्यांच्या बेरजेच्या राजकारणाला खिळ बसली आहे. संघटनात्मकदृष्ट्या होत असलेली ‘वजाबाकी’ चिंताजनक आहे. नुकतेच ज्येष्ठ नेते, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे भाजपात गेले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पडझडीच्या आणि जयंतरावांच्या ‘बॅकफूटवरील’ राजकारणाच्या काळात ही झालेली वजाबाकी शहर व इस्लामपूर मतदारसंघातील काही राजकीय समीकरणे बदलवणारी ठरेल.
सन १९७८ ला लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पराभव त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या स्व. विलासराव शिंदे यांनी केला. हा पराभव बापू समर्थकांच्या दृष्टीने धक्कादायक होता. दरम्यान सन १९८४ ला बापूंचे आकस्मिक निधन झाले. अन ध्यानीमनी नसताना जयंत पाटील यांना उच्च शिक्षण सोडून राजकारणात यावे लागले. पण पाच वर्षे त्यांनी केवळ साखर कारखान्याच्या परिघात राहून सहकारात काम केले. त्यावेळच्या निवडणुकीत विलासराव शिंदे व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यात लढत झाली. त्या निवडणुकीत नायकवडी जिंकले. सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील काँग्रेसमधून मैदानात आले. त्यांना शिंदे यांनी अपक्ष आव्हान दिले. पहिल्याच चुरशीच्या निवडणुकीत जयंतराव जिंकले. ते केवळ विधानसभा जिंकले नाहीत. तर काही काळातच बेरजेचे राजकारण साधून त्यांनी शिंदे यांना आपलेसे केले. ही बेरीज त्यांनी टप्प्याटप्याने वाढवत नेली.
स्व. खा. एस. डी. पाटील हे सांगली जिल्हयात स्व. यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व मानून काम करीत होते. त्यांचे पुत्र अॅड बी. एस. पाटील हे देखील बरीच वर्षे त्याच विचाराच्या वाटेवरून चालले. सुमारे ९० च्या दशकात अॅङ पाटील यांनी आ. पाटील यांचे नेतृत्व मानून काम करण्यास सुरुवात केली. अलिकडील काळात आ. पाटील व अॅड. पाटील यांचे पै-पाहुण्याचे संबंध निर्माण झाले आहेत.
सन १९९५ च्या निवडणुकीत भाजपाचे पूर्वीपासून कट्टर व अण्णासाहेब डांगे यांचे विश्वासू सहकारी अशोकदादा पाटील हे जयंतराव यांच्या विरोधात उत्तरले. पण अशोकदादा यांना हार पत्करावी लागली. काही वर्षांनी डांगे व अशोकदादा यांच्यात दरी निर्माण झाली. त्याचा फायदा घेत जयंत पाटील यांनी पुन्हा बेरीज साधून दादांना आपल्याकडे ओढले. त्यांना काही काळासाठी नगराध्यक्षपदाची संधी दिली. अशोकदादा व त्यांचे कुटुंब फारकाळ जयंतरावांच्या बरोबर राहिले नाही, हा भाग वेगळा. पण स्थानिक पातळीवर होणारा विरोध कमी करण्यात त्यांनी यश मिळवले. डांगे हे जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाचे पूर्वीपासून निष्ठावंत. सन १९९५ च्या युती शासनाच्या काळात डांगे यांना मंत्रीपद देण्यात आले. डांगे यांचा दबदबा आणि कामाचा झपाटा पक्षातील काही जणांना टोचणारा होता. त्यातून सन २००२ ला डांगे यांनी भाजपाला रामराम ठोकून खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. डांगेच्या राष्ट्रवादीत येण्याने पुन्हा जयंतराव यांच्या बेरजेत भर पडली. स्व. अशोकदादा पाटील यांचे पुतणे निशिकांत भोसले-पाटील हे आ. पाटील यांचे नेतृत्व मानून काम करीत होते. सन २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाला संधी न मिळाल्याने ते बाहेर पडले, विरोधी विकास आघाडीने त्यांना थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी दिली. तेजिंकले आणि कालांतराने भाजपात गेले. खऱ्या अर्थाने जयंतरावांच्या बेरजेच्या राजकारणाला तिथून पुढे छेद बसला. त्याच काळात स्व. विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे हेही भाजपात गेले. कालांतराने ते राष्ट्रवादीत स्वगृही परतले.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षासह बाहेर पडले. त्यांनी वाळवा तालुक्यात जयंतरावांच्या कट्टर मात्तबर नेत्यांची चाचपणी केली. पण त्यांच्या हाताला कुणीच लागले नाही. अजितदादांनी निकटचे स्नेही केदार पाटील यांना घेवून इस्लामपुरात पोखरण्यास सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निशिकांत भोसले-पाटील यांना उमेदवारी देवून भाजपातून आपल्याकडे खेचले. त्यांच्या पाठोपाठ खा. शरद पवार यांना मानणाऱ्या जिल्हयातील मातबरांना आपलेसे केले. साहजिकच काहीकाळ जिल्हयाचे नेतृत्व करणाऱ्या जयंतरावांचीच वजाबाकी झाली.
डांगे यांनी २३ वर्षे जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून काम केले. अॅङ राजेंद्र उर्फ चिमण डांगे व विश्वनाथ डांगे हे सक्रीय होते. मात्र त्यांचे राजकारण नगरपालिकेपुरते मर्यादीत राहिले. अण्णासाहेब हे सुरुवातीपासून अलिप्तवादी भूमिकेत राहिले. ते मनाने राष्ट्रवादीत रमले नाहीत. गेल्या आठवडयापासून चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून ते भाजपापर्यंत पोहोचले. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डांगे पिता-पुत्रांनी भाजपात घरवापसी केली. शहराच्या राजकारणात डांगेंची काही प्रभागात ताकद आहे. शिवाय धनगर समाज महासंघांच्या माध्यमातून त्यांचे जिल्हाभर नेटवर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील डांगेची वजाबाकी काही प्रमाणात राजकीय समीकरणे बदलवणारी ठरणार आहेत.
- जयंतरावांचे वेट अॅण्ड वॉच
इकडे मुबईत डांगे याची भाजपात घरवापसी होत असताना सांगलीत जयतरावानी माध्यमांशी बोलताना पक्षातून जाणारे जातील आणि थांबणारे थांबतील. मात्र थोड्या दिवसात बघा काय होतय ते! असे सूचक वक्तव्य केले. जयंतरावांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, याचा कुणालाच अंदाज आलेला नाही. त्यांच्या भाजपा प्रवेशाचीही मध्यंतरी चर्चा रंगली पुन्हा ही चर्चा थांबली असून जयंतराव निश्चित काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे.








